वणी मतदार संघात शांततेत पार पडलं मतदान, सायंकाळी ५ वाजता पर्यंत झालं ६३.७३ टक्के मतदान
प्रशांत चंदनखेडे वणी
महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आज २० नोव्हेंबरला मतदान प्रक्रिया पार पडली. वणी विधानसभा मतदार संघात शांततेत मतदान पार पडले. वणी शहरात एकूण ४९ तर तालुक्यात ३४१ मतदार केंद्र देण्यात आली होती. या सर्व मतदान केंद्रांवर प्रशासनाकडून सर्व सोइ सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. पोलिसांकडूनही चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
मतदान केंद्रांवर राखीव पोलिस दलाचे जवानही तैनात करण्यात आले होते. उमेदवारांसह जनतेनेही उत्स्फूर्तपणे मतदानाचा हक्क बजावला. दिव्यांग व्यक्तींनीही मतदान केंद्रांवर येऊन आवर्जून मतदान केले. वणी मतदार संघात एकूण ६३.७३ टक्के एवढे मतदान झाले आहे. या विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी घसरली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत वणी मतदार संघात ७१.११ टक्के एवढे मतदान झाले होते. मतदानाची टक्केवारी घसरण्यामागचं कारण काय, हा चिंतेचा विषय बनला आहे.
मतदार संघात सकाळी ७ वाजता पासून मतदानाला सुरुवात झाली. सकाळ पासूनच मतदान केंद्रांवर मतदारांची रेलचेल पाहायला मिळाली. दुपार नंतर मतदार केंद्रांवर मतदारांची गर्दी वाढली. दुपारी ३ वाजेपर्यंत ५६.९२ टक्के एवढं मतदान झालं होतं. तर ३ वाजेपासून ५ वाजेपर्यंत ६३.७३ टक्के एवढं मतदान झालं आहे. २ लाख ८४ हजार ६५३ मतदारांपैकी १ लाख ८२ हजार २७७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यात ९३ हजार ७९० पुरुष तर ८८ हजार ४६७ महिला मतदारांचा समावेश आहे.
शहरासह तालुक्यातील सर्वच मतदार केंद्रांवर सुरळीत मतदान पार पडलं. मतदान केंद्रांवर मतदारांसाठी मंडप टाकण्यात आले होते. पिण्याच्या पाण्याचीही सुविधा करण्यात आली होती. दिव्यांगांसाठी व्हील चेअरचीही व्यवस्था करण्यात आली होती. मतदारांना नावे शोधण्यात अडचणी येऊ नये म्हणून शासकीय कर्मचारीही मोठ्या प्रमाणात नियुक्त करण्यात आले होते. एकूणच मतदान केंद्रांवर सर्व सोइ सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. वणी मतदार संघात मतदान प्रक्रिया व्यवस्थित पार पडली असून १२ उमेदवाराचं भाग्य मशिनबंद झालं आहे. त्यामुळे आता वणी मतदार संघातून कोण बाजी मारणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत कुणाचा विजय होतो, हे २३ नोव्हेंबरला होणाऱ्या मत मोजणी नंतर स्पष्ट होणार आहे.
Comments
Post a Comment