वणी मतदार संघातील चुरशीच्या लढतीत कोण मारेल बाजी, निवडणूक निकालाची लागली सर्वांनाच उत्सुकता
प्रशांत चंदनखेडे वणी
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी थांबली असली तरी निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण मतदार संघाचे लक्ष लागले आहे. २३ नोव्हेंबरला सायंकाळ पर्यंत निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत. शनिवारी सकाळी ८ वाजता पासून मत मोजणीला सुरवात होणार असून सायंकाळी ६ वाजता विजयी उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात येणार आहे. शहरातील शासकीय गोदाम येथे मत मोजणी होणार आहे. याठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त राहणार आहे. एकूण २५ फेऱ्यांमध्ये १४ टेबलवर ही मत मोजणी होणार आहे. मत मोजणी करीता ८० कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. मत मोजणी सुरु असलेल्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची धांदल होणार नाही, याकडे प्रशासनाचे पूर्ण लक्ष राहणार आहे.
विधानसभा निवडणूक २०२४ साठी २० नोव्हेंबरला मतदान प्रक्रिया पार पडली. वणी मतदार संघात सुरळीत मतदान पार पडले. मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदानाचा हक्क बजावला. या विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारीही वाढली. वणी मतदान संघात ७४.८७ टक्के मतदान झाले. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यावेळी दोन ते अडीच टक्क्यांनी मतदानात वाढ झाली आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत वणी मतदार संघात ७२.११ टक्के एवढे मतदान झाले होते. तर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत वणी मतदार संघातून ७३.१७ टक्के मतदान झाले होते. मात्र २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत वणी मतदार संघात मतदारांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. त्यामुळे वणी मतदार संघातील वाढेलेल्या मतदानाने कुणाची नवका पार होईल, हे आता लवकरच स्पष्ट होणार आहे. सायंकाळी ५ वाजता नंतर मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सायंकाळी ५ वाजेपर्यंत ६३.७३ टक्के मतदान झालं होतं. तर ५ वाजता नंतर एकूण ७४.८७ टक्के एवढं मतदान झालं आहे.
वणी मतदार संघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी प्रमुख लढत झाली असली तरी मनसेचे राजू उंबरकर व काँग्रेसचे बंडखोर संजय खाडे यांनीही तगडं आव्हान उभं केलं आहे. त्यामुळे वणी मतदार संघात कोण कुणाचं गणित बिघडवतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. ओबीसी बहुल मतदार संघ असलेल्या वणी मतदार संघात दोन ओबीसी नेते एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. संजय देरकर व संजय खाडे यांनी एकमेकांच्या विरोधात दंड थोपटल्याने मत विभाजनाचा लाभ महायुतीचे उमेदवार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना तर मिळणार नाही, अशी खमंग चर्चा सुरवाती पासूनच ऐकायला मिळत आहे. त्यातच राजू उंबरकर हे देखील धोबी पछाड देण्याच्या इराद्याने मैदानात उतरल्याने त्यांचाही दावा महत्वाचा मानला जात आहे. एकूणच वणी मतदार संघात काट्याची टक्कर होणार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. चुरशीच्या झालेल्या या लढतीत कोण बाजी मारतो, याकडे संपूर्ण मतदार संघाचे लक्ष लागले आहे.
वणी मतदार संघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. मात्र काँग्रेस आमदारांच्या ऐटीत वावरण्याने त्यांची सर्वसामान्य मतदारांशी नाळ तुटत गेली. मतदारांनी सातत्याने विश्वास दाखवूनही कोंग्रेस आमदार मतदारांशी जुळवून घेण्यात अपयशी ठरले. त्यामुळे काँग्रेस आमदारांविषयी मतदारांमध्ये निर्माण झालेल्या नाराजीने या किल्ल्याला सुरुंग लागला. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा हा बालेकिल्ला भाजपच्या ताब्यात गेला. २०१९ च्या ही विधानसभा निवडणुकीत भाजपने हा गड राखला. विधानसभेच्या चार पंचवार्षिक निवडणुकीत वणी मतदार संघात विजय संपादन केलेल्या काँग्रेस आमदारांनी जनतेचा विश्वास टिकवून ठेवण्यात स्वारस्य दाखवलं नाही. त्यामुळे नंतर काँग्रेसला सातत्याने पराभवाचा सामना करावा लागला. मात्र यावेळी संजय खाडे या नव्या दमाच्या नेत्याने काँग्रेस कडून उमेदवारी मिळविण्याकरिता आटोकाट प्रयत्न केले. परंतु वणी मतदार संघ शिवसेनेच्या (उबाठा) कोट्यात गेला. नंतर शिवसेनेकडून संजय देरकर यांना उमेदवारी जाहीर झाली. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून संजय देरकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर संजय खाडे यांनी बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. संजय खाडे यांनी कडवं आव्हान उभं केल्याने महाविकास आघाडीला मतविभाजनाचा फटका बसू नये, असा सूर उमटत आहे. असे असले तरी महायुतीचे उमेदवार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्यापुढेही यावेळी मोठी आव्हाने उभी राहिली आहेत. त्यांनाही यावेळी मतदारांच्या नाराजीचा सामना करावा लागला. मात्र महाविकास आघाडी कडून काढण्यात आलेल्या दोन रॅली व पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रचार सभेला उसळलेला जनसागर पाहता, त्यांना मतदारांचा कौल मिळेल काय, अशी चर्चा वणी मतदार संघात रंगली आहे.
Comments
Post a Comment