प्रशांत चंदनखेडे वणी
मालवाहू पिकअप वाहनातून कत्तली करिता गोवंश जनावरे घेऊन जाणाऱ्या आरोपींना शिरपूर पोलिसांनी सापळा रचून मोठ्या शिताफीने अटक केली. गोवंश जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्या पिकअप वाहनासह पोलिसांनी तीन गोवंश जनावरे असा एकूण ९ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कार्यवाही ८ नोव्हेंबरला रात्री करण्यात आली. तालुक्यातून तेलंगणा राज्यात मोठ्या प्रमाणात गोवंश जनावरांची तस्करी केली जाते. गोवंश जनावरांची तस्करी करणारे तस्कर तालुक्यात सक्रिय आहेत. ते अतिशय गुप्तता बाळगून गोवंश जनावरांची तस्करी करतात. मात्र ठाणेदार माधव शिंदे यांनी गोवंश जनावरांच्या तस्करीचा डाव उधळून लावत दोन तस्करांना अटक केली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलिस स्टेशन हद्दीत रात्री पोलिस पथकासह गस्त घालणाऱ्या ठाणेदार माधव शिंदे यांना पिकअप वाहनातून गोवंश जनावरांची अवैध वाहतूक होणार असल्याची विश्वसनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे ठाणेदार माधव शिंदे यांनी पोलिस पथकासह वणी मुकुटबन मार्गावरील पठारपूर फाट्यावर नाकाबंदी केली. या मार्गाने मार्गक्रमण करणाऱ्या मालवाहू वाहनांची तपासणी करीत असतांनाच बुलेरो मॅक्स ही पिकअप या मार्गाने आली. पोलिसांनी या पिकअपला थांबवून पिकअपची तपासणी केली असता त्यात निर्दयीपणे कोंबून व एकमेकांना बांधून असलेली तीन गोवंश जनावरे आढळून आली. पिकअप चालकाला गोवंश जनावरे कुठे नेत आहे, अशी विचारणा केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. गोवंश जनावरांच्या वाहतुकीबाबत समाधानकारक उत्तर न मिळाल्याने गोवंश जनावरे कत्तली करीता नेण्यात येत असल्याचा संशय पोलिसांना आला. त्यामुळे पोलिसांनी पिकअप वाहन (MH २९ BE ८०४९) ताब्यात घेऊन पोलिस स्टेशनला आणले. तसेच गोवंश जनावरांना कत्तली करीता घेऊन जाणाऱ्या संदीप निंबाजी सोयाम (३८) रा, प्रिप्रडवाडी (मुकुटबन) व भास्कर मधुकर बट्टावर (२८) रा. मुकुटबन या दोन आरोपींना अटक करून पोलिसांनी त्यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहे. या कार्यवाहीत पोलिसांनी तीन गोवंश जनावरे किंमत ६५ हजार रुपये व एक पिकअप वाहन किंमत ९ लाख रुपये असा एकूण ९ लाख ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कार्यवाही एसडीपीओ गणेश किंद्रे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक ज्ञानोबा देवकते यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार माधव शिंदे, पोहवा गुणवंत पाटील, पोहवा प्रशांत झोड, नापोकॉ अनिल सुरपाम यांनी केली.

No comments: