Latest News

Latest News
Loading...

झरी तालुक्यातही संजय खाडे यांच्या प्रचाराचा धडाकेबाज शुभारंभ, मुकुटबन येथील प्रचार कार्यालयाचे थाटात उद्घाटन

प्रशांत चंदनखेडे वणी 

वणी मतदार संघात अपक्ष उमेदवारीतून इतिहास घडविण्याचा निर्धार करून निवडणूक रिंगणात उतरलेले संजय खाडे हे आपलं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी कठोर मेहनत घेत आहेत. वणी विधानसभा क्षेत्रात त्यांचा झंझावाती प्रचार पाहायला मिळत आहे. कार्यकर्ते जोरदार प्रचाराला लागले आहेत. त्यांचे समर्थकही त्यांच्या प्रचाराची धुरा समर्थपणे वाहतांना दिसत आहेत. त्यांना विजयी पथावर नेण्याकरिता त्यांचे समर्थक व कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. वणी व मारेगाव नंतर त्यांनी झरी तालुक्यातही धडाक्यात प्रचाराचा शुभारंभ केला आहे. मुकुटबन येथे संजय खाडे यांच्या प्रचार कार्यालयाचे थाटात उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर मुकुटबन येथे भव्य रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये माजी आमदार विश्वास नांदेकर, जेष्ठ नेते नरेंद्र ठाकरे, चंद्रकांत घुग्गुल यांच्यासह संजय खाडे यांचे कार्यकर्ते व समर्थक तसेच शिवसेना (उबाठा) व काँग्रेस पक्षातील नाराज पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संजय खाडे यांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात माजी आमदार विश्वास नांदेकर हे आपले विचार व्यक्त करतांना म्हणाले की, मी एक कडवट शिवसैनिक आहे. मागील ३० वर्षांपासून शिवसैनिक म्हणून काम करीत आहे. अनेक वर्षांपासून पक्षात राबणाऱ्या शिवसैनिकाऐवजी चार महिन्यात शिवसेनेत सक्रिय झालेल्या उमेदवाराला तिकीट मिळत असल्याने निष्ठावंत शिवसैनिक म्हणून माझ्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे मी संजय खाडे यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. तसेच माझ्यासोबत निष्ठावान शिवसैनिकांची साखळी जुळली आहे. 

नरेंद्र ठाकरे हे आपल्या मनोगतात म्हणाले की, ६२ वर्षाच्या काळात पहिल्यांदाच काँग्रेसची दयनीय अवस्था झाली आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला वणी विधानसभा क्षेत्रातून जवळपास ५७ हजार मतांची आघाडी मिळाली होती. असे असतांनाही हा मतदार संघ काँग्रेसच्या वाट्याला आला नाही. हा एकप्रकारे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर झालेला अन्याय आहे. संजय खाडे हे काँग्रेसचे धडाडीचे व जुने कार्यकर्ते आहेत. त्यांचं पक्षातील कार्य पाहूनच मी त्यांना पाठिंबा दिला आहे. तसेच काँग्रेसचा निष्ठावान कार्यकर्ता या लढाईत त्यांच्या पाठीशी उभा आहे.

कार्यालयाच्या उद्घाटनाला प्रसाद ठाकरे, प्रवीण बद्दमवार, समाधान कुनाटकर, निलेश बेलेकर, वासुदेव देठे, बंडू देवाळकर, चेतन बारशेट्टीवार, प्रणिता घुगुल, सुरेखा भोयर, किरण नांदेकर, खडकीचे सरपंच सौ. लोढे, अतुल निखाडे, प्रमोद डवरे, विठ्ठल पोटे, अरुण येनगंटीवार, उमेश चुक्कलवार, राहुल जलेलवार, महेश सिद्धमवार, जगदीश बोर्डावार आदी प्रामुख्याने उपस्थित होते. 

मुकुटबन येथील प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनानंतर संजय खाडे यांचा प्रचार दौरा अर्धवनकडे निघाला. अर्धवन येथे सभा घेण्यात आली. त्यानंतर मार्की येथे प्रस्थान करण्यात आले. मार्की येथे पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेला गावकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. त्यानंतर संजय खाडे हे आपल्या ताफ्यासह झरी येथे पोहचले. झरी येथील बिरसामुंडा यांच्या प्रतिमेला हारार्पण करून अभिवादन केल्यानंतर झरी येथील प्रचाराला सुरुवात करण्यात आली. यावेळी आम आदमी पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते संजय खाडे यांच्या प्रचारात सहभागी झाले होते. 

अपक्ष उमेदवार म्हणून ताकदीने निवडणूक लढविणाऱ्या संजय खाडे यांना गोंडवाना संग्राम पक्षाने विनाशर्त आपला पाठिंबा दर्शविला. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. निरंजन मसराम यांनी तसे पत्र संजय खाडे यांना लिहून दिले. गोंडवाना पार्टीचे नेते बंडू सिडाम यांनी संजय खाडे यांच्या वणी येथील प्रचार कार्यालयाला सदिच्छा भेट देऊन पाठिंब्याचे पात्र संजय खाडे यांना सोपविले. यावेळी बंडू सिडाम यांनी पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते संजय खाडे यांच्या प्रचारार्थ मैदानात उतणार असल्याचे जाहीरपणे सांगितले. संजय खाडे यांचं वाढतं राजकीय वलय बघता अपक्ष उमेदवार म्हणून ते वणी मतदार संघात इतिहास घडवतील काय, या चर्चा आता रंगू लागल्या आहेत. 

No comments:

Powered by Blogger.