भारतीय संविधान या विषयावर शहरात जाहीर व्याख्यान, रंगणार वैचारिक प्रबोधनाची मैफिल
प्रशांत चंदनखेडे वणी
वैचारिक प्रबोधनाची चळवळ उभी करून ती अविरत पुढे नेण्याचा विडा काही बुद्धिवादी लोकांनी उचलला आहे. खुळचट विचारांचं काहूर डोक्यातून काढण्याकरीता विचारवंतांनी प्रबोधनाचं माध्यम उभं केलं आहे. त्यामुळे वैचारिक प्रबोधनाचा वारसा पुढे नेणं ही आज काळाची गरज झाली आहे. वैज्ञानिक दृष्टीकोन बाजूला सारून आध्यात्मिक वातावरण निर्माण करून आधुनिक विचारसरणीचं पतन करण्याकडे परत वाटचाल सुरु झाली आहे. मानवी जीवनाला आध्यात्मिकतेकडे वळवण्याचं रीतसर काम सुरु झालं आहे. वास्तविक विचारसरणीला फाटा देत दैववादी विचार डोक्यात भरविण्याचं काम केलं जात आहे. मानवी मनात खुळचट विचारांची पेरणी करून त्यांना भयभीत केलं जात असल्याने ते अंधश्रद्धेकडे वळू लागले आहेत. त्यामुळे महापुरुषांचे वास्तववादी विचार लोकांपर्यंत पोहचावे याकरिता प्रबोधन होणे गरजेचे झाले आहे. आणि हाच दृष्टिकोन ठेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारमंच वैचारिक सोहळे आयोजित करीत आहे. यावर्षी या विचारमंचाने जाहीर व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. प्रख्यात विचारवंतांचे विचार या व्याख्यानातून ऐकायला मिळणार आहे.
संविधान दिनाचे औचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारमंच वणी द्वारा ३० नोव्हेंबरला सायं. ६ वाजता स्थानिक एसबी लॉन येथे जाहीर व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. भारताचे संविधान हा या व्याख्यानाचा विषय असणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ आंबेडकरी विचारवंत प्रा. डॉ. प्रकाश सिरसाट (छत्रपती संभाजी नगर) हे राहतील. तर कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधी विद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद हेरोडे (छत्रपती संभाजी नगर), आनंद निकेतन महाविद्यालयाचे प्रा. तक्षशिल सुटे (वरोरा) हे उपस्थित राहणार आहेत. प्राचार्य डॉ. प्रमोद हेरोडे यांचं भारतीय संविधान निर्मितीचा इतिहास आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका या विषयावर तर प्रा. तक्षशील सुटे यांचं भारतीय संविधान आणि अनु. जाती, जमाती व ओबीसी समाजापुढील आव्हाने या विषयावर व्याख्यान होणार आहे. संविधाना विषयी देशातीलच काही बिनडोक लोक उलट सुलट बरळतांना दिसतात. संविधाना बाबत वेगवेगळ्या चर्चा ऐकायला मिळतात. संविधान हे भारतीय जनतेचा प्राण आहे. भारतीय संविधान बदलविण्याची भाषा करण्यात येत असल्याने नागरिकांचा कल आता संविधान संवर्धनाच्या दिशेने असला पाहिजे. आणि याच उद्दात हेतूने या जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या जाहीर व्याख्यानाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारमंच वणी द्वारा करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment