शिंदोला परिसरात वाघिणीचा दोन बछड्यांसह मुक्त संचार, वाघिणीचा बंदोबस्त करण्याची गावकऱ्यांची मागणी

प्रशांत चंदनखेडे वणी 

गाव शिवारात परत वाघांचे दर्शन होऊ लागले आहे. झुडपी जंगलात वाघांचा वावर दिसून येत आहे. वाघांनी गाव शिवरांकडे मोर्चा वळविल्याने मानवी मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावकऱ्यांना वाघांचे दर्शन होत असल्याने त्यांच्यात कमालीची धास्ती निर्माण झाली आहे. सध्या शेतीचा हंगाम सुरु आहे. त्यामुळे शेतकरी व शेत मजुर शेत कामात व्यस्त आहेत. अशातच गाव शिवारात वाघांचा वावर वाढल्याने शेतात जातांना त्यांना धडकी भरू लागली आहे. शिंदोला परिसरात मागिल दोन महिन्यांपासून एक वाघीण आपल्या बछड्यांसह मुक्त संचार करीत असल्याने गाववासी भीतीच्या वातावरणात वावरत आहेत. या वाघिणीचा व तिच्या छाव्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शिंदोला गाववासीयांनी वणी वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. 

शिंदोला परिसरात एक वाघीण आपल्या दोन बछड्यांसह संचार करीत असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. या वाघिणीने एका गोऱ्यासह गायीचीही शिकार केली असल्याचे सांगण्यात येते. मागील दोन महिन्यांपासून ही वाघीण आपल्या दोन बछड्यांसह ढेमेश्वर गौरकार यांच्या शेताजवळ वावरत असून अनेकांना या वाघिणीचे दर्शन देखील झाल्याचे सांगण्यात येत आहे. या वाघिणीमुळे शेतकरी व शेतमजुरांच्या जीविताला धोका उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच कारखान्यात काम करत असलेल्या कामगारांनाही ही वाघीण आपल्या बछड्यांसह दिसल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे ही वाघीण मनुष्यावर हल्ला चढविण्यापूर्वी तिचा बंदोबस्त करण्याची मागणी लुकेश्वर बोबडे यांच्यासह गाववासीयांकडून करण्यात आली आहे. तसे निवेदनही त्यांनी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना दिले आहे. या निवेदनावर प्रीतम बोबडे, शेख बानू शेख अली, महेंद्र नागभीडकर, दिलीप नागभीडकर, गणपत ताजने, विठ्ठल मेश्राम, शंकर तुराणकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. 

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी