प्रशांत चंदनखेडे वणी
उमेदवारी जाहीर झाल्यापासूनच राजू उंबरकर हे निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. गावागावात जाऊन ते जनतेच्या भेटी गाठी घेत आहेत. सतत ते जनतेच्या संपर्कात आहेत. या विधानसभा निवडणुकीत विजयाचा गुलाल उधळायचाच हे उद्दिष्ट ठेऊन त्यांनी व्यूहरचना आखली आहे. मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्तेही राजू उंबरकर यांच्या विजयासाठी प्रचंड मेहनत घेत आहेत. या निवडणुकीत राजू उंबरकर यांना जनतेचा कौल मिळेलच असा त्यांना आशावाद आहे. त्यामुळे ते प्रचंड उत्साही दिसून येत आहेत. गावागावात जाऊन ते राजू उंबरकर यांच्या कार्याची माहिती देत आहेत. तसेच राजू उंबरकर हे देखील गावागावात जाऊन जनतेशी संवाद साधत आहेत. आता त्यांच्या प्रचारार्थ आपल्या विशिष्ट शैलीतील भाषणाने मैदान गाजविणारे राज ठाकरे वणी विधानसभा क्षेत्रात येत असल्याने सर्वांचच या प्रचार सभेकडे लक्ष लागलं आहे
मनसेचे राष्ट्रीय अध्यक्ष राज ठाकरे हे ५ नोव्हेंबरला विदर्भ दौऱ्यावर येत आहेत. वणी मतदार संघातून त्यांच्या प्रचार सभेला सुरुवात होणार आहे. काही दिवसांपूर्वी ते विदर्भाच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी वणी येथे मुक्काम केला होता. हा त्यांचा विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवारांच्या चाचपणी करीता केलेला दौरा होता. वणी येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आणि याच वेळी त्यांनी राजू उंबरकर यांना वणी विधानसभेची उमेदवारी जाहीर केली. वणी मतदार संघातून राजू उंबरकर यांनाच सर्वप्रथम उमेदवारी जाहीर झाली होती. आणि आता त्यांच्याच प्रचारार्थ वणी मतदार संघात पहिली जाहीर सभाही होत आहे. वणी मतदार संघात राजू उंबरकर यांचे कडवे आव्हान राहणार आहे. विजयाच्या निश्चितीने ते यावेळी मैदानात उतरले आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांच्या प्रचार सभेकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. मतदारांवर प्रभाव पाडण्यात राज ठाकरे कितपत यशस्वी ठरतात, हे येणारा काळच सांगेल. पण ते आपल्या रोकठोक भाषणातून कुणाचा कसा बुरखा फाडतील हे ऐकण्याची वणी विधानसभा क्षेत्रातील जनतेला उत्सुकता लागली आहे. त्यामुळे त्यांची प्रचार सभा मैदान गाजवेल यात दुमत नाही.

No comments: