प्रशांत चंदनखेडे वणी
भालर वसाहत येथे राहणारे हे दोन्ही मित्र मोटारसायकलने वणी वरून भालरला जात असतांना हनुमान मंदिराजवळील वळण रस्त्यावर त्यांची दुचाकी अनियंत्रित होऊन रस्त्याच्या खाली उतरली. रस्त्यापासून काही अंतरावर असलेल्या शूशगंगा टाऊनशिपच्या कंपाऊंडला ही भरधाव दुचाकी धडकली. यात प्रशांत कुमार हा तरुण जागीच ठार झाला तर दुचाकी चालक रोनित मिश्रा हा त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. प्रशांत कुमार हा दोन वर्षांपूर्वीच वेकोलित नोकरीला लागला होता. वेकोलिच्या उकनी कोळसाखाणीत तो मायनिंग सरदार या पदावर कार्यरत होता. मूळचा परप्रांतीय असलेला हा तरुण भालर वसाहत येथे राहत होता. ३ नोव्हेंबरला रात्री तो मित्रासोबत वणीला आला. त्यानंतर हे दोघेही भालरला परतत असतांना हा भीषण अपघात घडला. नवीनच घेतलेल्या मोटारसायकलने सुसाट जात असतांना हनुमान मंदिराजवळील वळण रस्त्यावर दुचाकी चालकाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. आणि दुचाकी रस्त्याच्या खाली उतरली. भरवेगात ही दुचाकी शूशगंगा टाऊनशिपच्या कंपाऊंडला धडकली. या भीषण अपघातात दुचाकीवर मागे बसून असलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर दुचाकी चालक गंभीर जखमी झाला आहे. अपघाताची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमीला उपचारार्थ तर मृतदेह उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालयात पाठवला. घटनेचा पुढील तपास जमादार संतोष आढाव करीत आहे.


No comments: