Latest News

Latest News
Loading...

संजय खाडे यांनी वाजविली शिट्टी आणि विश्वास नांदेकर यांनी दिली साद, वणी मतदार संघात बंडखोरीचा घंटानाद

प्रशांत चंदनखेडे वणी 

वणी विधानसभा मतदार संघ काँग्रेसच्या वाट्याला न गेल्याने प्रचंड निराश झालेल्या संजय खाडे यांनी शेवटी वेगळी चूल मांडली. त्यांना काँग्रेस कडून एबी फॉर्म न मिळाल्याने त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून केलेला अर्ज कायम ठेवला. आणि आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून ताकदीने लढण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांनी काँग्रेसचे बंडखोर म्हणून नाराजांच्या तयार केलेल्या आघाडीत शिवसेनेचे (उबाठा) जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर हे देखील जुळले आहेत. त्यांनी संजय खाडे यांना समर्थन देण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेतून बाहेर पडत त्यांनी आपल्या काही कार्यकर्त्यांसह बंड पुकारलं आहे. काँग्रेस व शिवसेनेच्या नेत्यांनी नाराजीचा सूर लावून धरल्याने वणी मतदार संघातील स्वर बदलण्याची कुणकुण सुरु झाली आहे. आज संजय खाडे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविण्याचं जाहीर केलं. त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेला काँग्रेसची बरीच नेते मंडळी उपस्थित होती. शिवसेनेच्याही जिल्हा प्रमुखांनी पक्षातुन बाहेर पडत संजय खाडे यांना जाहीर पाठिंबा दर्शविला. त्यामुळे पक्षांतर्गत बंडखोरीने महाविकास आघाडीच्या मतांचं विभाजन होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. 

आज उमेदवारी मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यात संभाजी ब्रिगेडचे अजय धोबे, राष्ट्रीय गोंडवाना पार्टीचे प्रविण आत्राम, अपक्ष असीम हुसेन मंजूर हुसेन व यशवंत बोन्डे या चार उमेदवारांनी निवडणुकीतून आपले नामांकन वापस घेतले. त्यामुळे आता १२ उमेदवार निवडणूक रिंगणात उरले आहेत. त्यापैकी संजय खाडे यांच्या निर्णयाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. परंतु त्यांनी निवडणूक लढविण्याचा ठाम निर्णय घेतल्याने निवडणुकीतील चुरस आता वाढली आहे. त्यांनी काँग्रेस कडून उमेदवारी मिळावी म्हणून शर्थीचे प्रयत्न केले. मात्र वणी मतदार संघ शिवसेनेच्या (उबाठा) कोट्यात गेला. त्यानंतरही संजय खाडे यांना काँग्रेस कडून एबी फॉर्म मिळेल ही आशा लागली होती. मात्र तसे झाले नाही. परंतु काँग्रेसचे बंडखोर उमेदवार म्हणून त्यांनी शेवटी अपक्ष निवडणूक लढण्याचा धाडसी निर्णय घेतला. आणि काँग्रेसच्याच काही नाराज नेत्यांनी त्यांना पाठिंबा दर्शविला. एवढेच नाही तर शिवसेनेच्या खंद्या नेत्याने यांच्या समर्थनार्थ पक्षाशी बंड पुकारल्याने नाराजांचीही एक आघाडी तयार झाली आहे. त्यामुळे वणी मतदार संघात महाविकास आघाडीला त्याची झळ बसण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. महविकास आघाडीचं गणित बिघडविण्यात पक्षांतर्गत नाराजी व नाराजांचं संघटन तर कारणीभूत ठरणार नाही ना, असा सूर आता उमटू लागला आहे. 

संभाजी ब्रिगेडने संजय देरकर यांना दर्शविला पाठिंबा 

संभाजी ब्रिगेडचे अजय धोबे यांनी आज आपला नामांकन अर्ज वापस घेतला. त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देरकर यांना आपला जाहीर पाठिंबा दर्शविला. आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन संजय देरकर यांना निवडणुकीत पूर्ण सहकार्य करण्याची घोषणा केली. त्यांच्या प्रचारार्थ संभाजी ब्रिगेड मैदानात उतणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. संभाजी ब्रिगेड हा संविधानाला मानणारा पक्ष असून संविधान विरोधी भूमिका घेणाऱ्यांच्या विरोधात तो महाविकास आघाडीच्या सोबत असल्याचे अजय धोबे यांनी यावेळी जाहीर केले. 

अपक्ष उमेदवारांना आज निवडणुकीचे चिन्ह देखील मिळाले. यात संजय खाडे यांना शिट्टी हे बोध चिन्ह मिळाले आहे. शिट्टी वाजवून त्यांनी आज विजयाचा नारा दिला. शिट्टी वाजवून वणी मतदार संघातील मतदारांना जागृत करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. रंगनाथ स्वामी मंदिरातून ते आपल्या प्रचाराचं नारळ फोडणार आहेत. पत्रकार परिषदेत ते प्रचंड भावुक झाले होते. काँग्रेसशी असलेली एकनिष्ठता कथन करतांना त्यांच्या डोळ्यात अश्रू तरंगले. २६ वर्षांपासून काँग्रेसशी निष्ठावान राहिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. काँग्रेस कार्यकर्त्यांच्याच आग्रहावरून आपण निवडणूक लढवीत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे काँग्रेस नेत्यांची ताकद आपल्या पाठीशी राहणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. काँग्रेस समर्थित अपक्ष उमेदवार म्हणून आपण निवडणूक रिंगणात उतरलो असल्याचे त्यांनी यावेळी बोलून दाखविले. 

अन्य उमेदवारांमध्ये केतन पारखी यांना बॅट हे चिन्ह मिळाले. तर नारायण गोडे यांना ट्रम्पेट, निखिल ढुरके यांना माईक, हरीश पाते यांना कपाट व नारायण आत्राम यांना जेवणाचे ताट हे बोध चिन्ह मिळले आहे. चार उमेदवार हे मान्यता प्राप्त पक्षांचे अधिकृत उमेदवार आहेत. तर वंचित व सीपीआय या नोंदणीकृत पक्षांचे दोन उमेदवार आहेत. असे एकूण १२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. उद्या ५ नोव्हेंबर पासून प्रचार तोफा डागल्या जाणार आहेत. त्यामुळे प्रचारात आघाडी घेण्याची स्पर्धा आता उद्यापासून पाहायला मिळणार आहे. 

No comments:

Powered by Blogger.