प्रशांत चंदनखेडे वणी
नैराश्येने ग्रासलेले तरुण स्वतःला मृत्यूच्या स्वाधीन करू लागले आहेत. जीवन जगण्याची उमेद न बाळगता मृत्यूचा मार्ग निवडणाऱ्या तरुणांच्या आत्महत्यांनी चिंता निर्माण केली आहे. सतत होणाऱ्या आत्महत्यांमुळे येथे मरण झालं स्वस्त असे म्हणण्याची वेळ आहे. सर्वत्र दिवाळीचा आनंद बहरलेला असतांना या तरुणाने मृत्यूचा फास गळ्याभोवती आवळला. रोजमजुरी करणारा हा तरुण आपल्या आई सोबत वागदरा येथे राहत होता. तो अविवाहित होता. त्याचा भाऊ ट्रक डायव्हर आहे. तो बाहेरगावी राहतो. आई शेतमजूरीची कामे करते. रात्री उशिरा चेतनने घराच्या आड्याला गळफास लावला. पहाटे ४ ते ५ वाजताच्या सुमारास चेतनची आई झोपेतून उठल्यानंतर तिला चेतन हा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. मुलाला गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहून आईने एकच हंबरडा फोडला. तिच्या जोरजोरात रडण्याच्या आवाजाने शेजारी गोळा झाले. दरम्यान घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठले. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करीता ग्रामीण रुग्णालयात पाठविला. चेतनच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही. मात्र त्याच्या आत्महत्या करण्याने वृद्ध आईला जबर धक्का बसला आहे. त्याच्या पश्च्यात आई व एक भाऊ असा आप्त परिवार आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस करीत आहे.


No comments: