Latest News

Latest News
Loading...

महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत संजय देरकर यांच्या प्रचार कार्यालयांचे उद्घाटन

प्रशांत चंदनखेडे वणी 

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून आज पासून उमेदवारांनी प्रचार मोहिमेचा आरंभ केला आहे. महाविकास आघाडीचे शिवसेना (उबाठा) गटाचे उमेदवार संजय देरकर यांच्या प्रचारासाठी संपूर्ण महाविकास आघाडी एकवटली आहे. आज संजय देरकर यांच्या तीनही तालुक्यातील प्रचार कार्यालयांचे थाटात उद्घाटन करण्यात आले. शहरातील श्री रंगनाथ स्वामी मंदिरात पूजाअर्चा केल्यानंतर वणी येथील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. तर वनोजादेवी मंदिरात महाआरती व भांदेवाडा येथे जगन्नाथ महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर मारेगाव येथील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे खासदार संजय देशमुख, जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र गायकवाड, राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष वर्षा निकम यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

महाविकास आघाडीत वणी मतदार संघ हा शिवसेनेच्या वाट्याला गेल्यानंतर पक्षाने संजय देरकर यांना उमेदवारी जाहीर केली. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून संजय देरकर यांच्या नावावर शिक्का मोर्तब करण्यात आले.  त्यांना उमेदवारी मिळाल्याने शिवसैनिकांत प्रचंड उत्साह संचारला. संजय देरकर यांचा उमेदवारी अर्ज भरतांना शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वणी मतदार संघात शिवसेनेची मशाल पेटवायचीच हे धेय्य ठेऊन शिवसैनिक जोमाने कामाला लागले आहेत. संजय देरकर यांच्या विजयासाठी शिवसैनिकांकडून प्रचंड मेहनत घेतली जात आहे. गावागावात फिरून शिवसैनिक नागरिकांच्या भेटी घेत आहेत. शिवसेना सर्वसामान्यांसाठी नेहमी झटली असल्याची माहिती ते नागरिकांना देत आहेत. महाविकास आघाडीचे घटक पक्षही संजय देरकर यांच्या विजयासाठी एकवटले आहेत. माजी आमदार वामनराव कासावार, ऍड. देविदास काळे, टिकाराम कोंगरे, डॉ. महेंद्र लोढा, आशिष खुलसंगे हे काँग्रेसचे दिग्गज नेते व बरेच अनुभवी पदाधिकारी व कार्यकर्ते संजय देरकर यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते विजय नगराळे हे देखील आपल्या कार्यकर्त्यांसह संजय देरकर यांच्या प्रचारात उतरले आहेत. शिवसेनेचे सर्व खंबीर नेते, पदाधिकारी व कार्यकर्तेही संजय देरकर यांच्या प्रचाराची धुरा खंबीरपणे वाहत आहेत. 

आज संजय देरकर यांच्या तीनही तालुक्यातील प्रचार कार्यालयांचे उद्घाटन महाविकास आघाडीच्या सर्व नेते मंडळींच्या उपस्थितीत करण्यात आले. शहरातील साईबाबा मंदिराच्या बाजूलाच महाविकास आघाडीचे प्रचार कार्यालय सुरु करण्यात आले आहे. तसेच मारेगाव व झरी येथेही प्रचार कार्यालयांचा शुभारंभ करण्यात आला आहे. यानंतर नियोजनबद्ध पद्धतीने वणी विधानसभा क्षेत्रात प्रचार मोहीम आरंभ करण्यात येणार आहे. सर्व नेत्यांवर त्या त्या क्षेत्रातील प्रचाराची जबाबदारी देण्यात येणार आहे. त्यानंतर रात्री प्रचार कार्यालयात आढावा बैठक घेण्यात येणार आहे. अनुभवी नेत्यांची फळी संजय देरकर यांच्या सोबत असल्याने विजयासाठीचे डावपेच आखण्यात त्यांचे मोठे योगदान लाभणार आहे. महाविकास आघाडीतील मातब्बर नेत्यांना निवडणूक लढण्याचा आणि व्यूहरचना आखण्याचा दीर्घ अनुभव आहे. या अनुभवाच्या जोरावर ते संजय देरकर यांच्या विजयाचा मार्ग सरळ व सोपा करतील अशी चर्चा ऐकायला मिळत आहे. शेवटी मतदारांचा कौल मिळण्यावर विजयाचं गणित अवलंबून राहणार आहे.

No comments:

Powered by Blogger.