प्रशांत चंदनखेडे वणी
महाराष्ट्रात जाती धर्माच्या नावावर राजकारण केलं जात आहे. मतदार संघातील जातीच्या टक्केवारी वरून उमेदवारी दिली जात आहे. महाराष्ट्रासारख्या जातीय सलोखा जपणाऱ्या राज्यात जातीय कट्टरता निर्माण करून मानवी मनात जातियतेचं विष पेरण्याचं काम करण्यात येत आहे. एखाद्याला गंभीर आजार झाल्यास तो तज्ज्ञ डॉक्टरांकडे उपचार घेईल की जातीचा डॉक्टर पाहील. त्यामुळे उमेदवारही निवडतांना तो योग्य आहे की नाही हे पडताळणं गरजेचं आहे. जातीय भावना भडकावून जनतेला दुभांगण्याचं काम महाराष्ट्रात केलं जात आहे. त्यामुळे जातीय वितुष्ट निर्माण करून सत्तेची पोळी शेकणाऱ्यांचे डाव आता सुज्ञ नागरिकांनी ओळखले पाहिजे. महाराष्ट्रात सत्ता भोगणाऱ्यांनी जनतेच्या मतांचं केवळ भांडवल केलं आहे. त्यांना निवडणुकीपुरताच जनतेचा कळवळा येतो. नंतर जनता मरण यातना भोगत असली तरी यांचं हृदय पाझरत नाही. महाराष्ट्राची काय अवस्था झाली आहे, हे जनतेला कळूनही वळत कसं नाही, हेच कळत नाही. यवतमाळ जिल्ह्याची पांढरं सोनं उगवणारा जिल्हा ही ओळख पुसली गेली आहे. आता यवतमाळ जिल्ह्याला आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून ओळखलं जातं. ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे. शेतकरी मृत्यूचा फास गळ्याभोवती आवळतो आहे. आणि आपण निवडून दिलेले आमदार या पक्षातून त्या पक्षात कोलांट उड्या मारत आहेत. आपण निवडलेले आमदार आर्थिक राजकरण करण्यात गुंग झाले असून आज याच्या तर उद्या त्याच्या मांडीला मांडी लावून बसत आहेत. वाटोळं केलं आहे सत्ता भोगणाऱ्यांनी महाराष्ट्राचं. मागील पाच वर्षांतलं महाराष्ट्रातलं राजकारण बघून जर जनतेचे डोळे उघडत नसेल तर मग तुमचे निर्णय तुम्हाला लखलाभ, असं खणखणीत वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं.
वणी विधानसभा क्षेत्राचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार राजू उंबरकर यांच्या प्रचारार्थ स्थानिक शासकीय मैदानावर घेण्यात आलेल्या भव्य जाहीर सभेत ते बोलत होते. त्यांनी महाराष्ट्रातील बदलत्या राजकीय परिस्थितीचे विश्लेषण केले. सर्व राजकीय पक्षांना संधी देऊन बघितली, एकदा मनसेला संधी देऊन बघा असे आवाहनही त्यांनी या भव्य सभेतून केले. राजू उंबरकर हे आमदार नसतांनाही ते नेहमी जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. त्यांनी जनतेचे प्रश्न व मतदार संघातील समस्या स्वबळावर सोडविल्या. त्यामुळे हा माणूस आमदार झाल्यास मतदार संघातील प्रश्न आणखी ताकदीने सोडवेल. महाराष्ट्रातील राजकारणाची दिशा पूर्णतः बदललली आहे. महाराष्ट्रात संधीसाधू लोक सत्तेत येऊ लागले आहेत. स्वहिताचं राजकारण सध्या पाहायला मिळत आहे. मतदारांचा केवळ मतांसाठी वापर केला जातो. नंतर ५ वर्ष जनतेकडे ढूंकूनही बघितलं जात नाही. तत्वाशी बांधिल न राहणारे लोक लोक सत्तेत बसत असल्याने जनतेची पाच वर्ष व्यर्थ जात आहेत. त्यामुळे तत्वनिष्ठ उमेदवारांनाच निवडून देण्याचं आवाहन करतांनाच मनसेच्या उमेदवारांवर एकदा विश्वास दाखविण्याची विनंती त्यांनी मतदारांना केली.
राज ठाकरे यांची सभा आणि लोकांची गर्दी हे समीकरणच जुळलं आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या याही सभेला नागरिकांची प्रचंड गर्दी उसळी होती. वणी विधानसभा क्षेत्रातून त्यांचं भाषण ऐकण्याकरिता मोठ्या प्रमाणात नागरिक आले होते. भव्य शासकीय मैदान नागरिकांच्या गर्दीने फुलून निघालं होतं. राज ठाकरे यांचं भाषण ऐकण्याकरिता नागरिक आतुर झाले होते. रात्री ८ वाजता राज ठाकरे यांचं सभास्थळी आगमन झालं. आणि उपस्थितांमध्ये कमालीचा उत्साह संचारला. राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांबरोबरच विरोधकांचाही खरपुच समाचार घेतला. महाराष्ट्रातील या ५ वर्षाच्या राजकारणावर त्यांनी चांगलेच ताशेरे ओढले. यावेळी राजू उंबरकर यांनी देखील आपल्या खास शैलीत विद्यमानांच्या विकासाची दशा आणि दिशा जनतेपुढे मांडली. आपला भाऊ व मुलगा म्हणून माझ्यावर विश्वास दाखवून मला एकदा या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी द्या, अशी साद त्यांनी मतदारांना घातली. या जाहीर सभेला मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच या सभेला नागरिकांचाही प्रचंड प्रतिसाद लाभला. सभेला नागरिकांनी प्रचंड गर्दी केल्याचे पाहायला मिळाले.

No comments: