Latest News

Latest News
Loading...

समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या भाजपच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

 

प्रशांत चंदनखेडे वणी 

एका समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे तिव्र पडसाद शहरात उमटले. समाजाने एकत्र येत या व्यक्तव्याचा तीव्र निषेध केला. एवढेच नाही तर समाजाची बदनामी करणारे वक्तव्य करून समाजाच्या भावना दुखावणाऱ्या त्या असामाजिक तत्वाला अटक करण्याच्या मागणीला घेऊन समाज एकवटला. समाजाच्या लोकांनी पोलीस स्टेशनवर मोर्चा काढून आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. एवढेच नाही तर त्या व्यक्ती विरुद्ध समाजाच्या वतीने पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविण्यात आली. समाजाच्या लोकांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी जातीय भावना दुखावणाऱ्या त्या व्याक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. सुधीर साळी वय अंदाजे ४२ वर्ष असे या वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. 

सुधीर साळी हे भाजपचे वणी विधानसभा क्षेत्राचे पदाधिकारी आहेत. ४ नोव्हेंबरला भाजपच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन झाले तेंव्हा सुधीर साळी हे देखील उद्घाटन कार्यक्रमात उपस्थित होते. भाजपचे उमेदवार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाला माजी खासदार हंसराज अहिर हे प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच भाजपचे सर्व नेते, पदाधिकारी व कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आटोपल्यानंतर सुधीर साळी हे काही कार्यकर्त्यांशी चर्चा करीत असतांना त्यांची जीभ घसरली. त्यांनी कुणबी समाजाबद्दल खेदजनक वक्तव्य केलं. त्यांनी केलेलं वक्तव्य त्याच कार्यक्रमात उपस्थित असलेल्या कुणबी समाजाच्या कार्यकर्त्याच्या कानावर पडलं. नंतर या वक्तव्यावरून या दोघांमध्ये चांगलाच वादंग झाला. एवढेच नाही तर सुधीर साळी यांनी केलेल्या वक्तव्यावरून संतप्त झालेल्या समाजाच्याच कार्यकर्त्यांनी त्यांना चांगलाच चोप दिला. हे वृत्त नंतर समाज माध्यमांवर झळकले. या बदनामीकारक वक्तव्यामुळे समाज चांगलाच आक्रमक झाला. कुणबी समाजाच्या प्रतिनिधींनी तात्काळ यासंदर्भात बैठक घेतली. या सामाजिक द्वेष निर्माण करणाऱ्या वक्तव्याचा समाजाकडून तीव्र निषेध करण्यात आला. त्यानंतर समाज बांधव पोलिस स्टेशनवर धडकले. त्यांनी समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या सुधीर साळी या भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. एवढेच नाही तर समाजाच्या वतीने वासुदेव लक्ष्मण विधाते (५३) रा. गुरुनगर यांनी सुधीर साळी याच्या विरुद्ध पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविली. त्यांच्या तक्रारी वरून पोलिसांनी सुधीर साळी या भाजपच्या पदाधिकाऱ्यावर बीएनएसच्या कलम ३५३ (१)(C), ३५३(२) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार अनिल बेहेरानी यांच्या मार्गदर्शनात एपीआय अश्विनी रायबोले करीत आहे. 

दरम्यान ६ नोव्हेंबरला कुणबी समाज बांधवांनी पत्रकार परिषद घेऊन कुणबी समाजाला डिवचणाऱ्या त्या भाजप पदाधिकाऱ्याला अटक करण्यात न आल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. कुणबी समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या त्या भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र त्याला अद्यापही अटक करण्यात आली नाही. त्यामुळे समाजात रोष दिसून येत आहे. कुणबी समाजाबद्दल अप्रिय शब्द प्रयोग करूनही त्या व्यक्तीला अटक करण्यात न आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य करणाऱ्या सुधीर साळी नामक भाजप पदाधिकाऱ्याला अटक करण्यात न आल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा कुणबी समाज बांधवांनी दिला आहे. 

आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी केले खंडन 

या संदर्भात आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी तातडीने पत्रकार परिषद घेऊन भाजप प्रचार कार्यालयात असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे स्पष्टीकरण दिले. प्रचार कार्यलयाबाहेर दोन कार्यकर्त्यांमध्ये आपसी वाद झाला व तारेंद्र बोर्डे हे त्या दोघांचा वाद मिटविण्याकरीता मध्यस्थी करण्यास गेल्याचे बोदकुरवार यांनी सांगितले. भाजप जमाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य करणाऱ्या कोणत्याही कार्यकर्त्याचे समर्थन करीत नाही. सुधीर साळी हा एक ते दीड वर्षांपूर्वी  कार्यकर्ता म्हणून भाजपशी जुळला. पक्षाचे कार्य करू इच्छिणाऱ्यांना आपण नाकारू शकत नाही. भाजपशी प्रत्येक समाजाचे लोक जुळले आहेत. भाजापची सामाजिक तेढ निर्माण करण्याची भूमिका कधी राहिली नाही. कार्येकर्ते आपापसात काय बरळतात याकडे सर्वोतपरी लक्ष देणं शक्य होत नाही. या दोघांमध्ये कुठलं वादग्रस्त वक्तव्य झालं व त्यांच्यात कोणत्या कारणावरून वाद झाला याचा खुलासा अद्याप झाला नाही. मात्र भाजपचा कोणताही कार्यकर्ता सामाजिक भावना दुखावणारे वक्तव्य करीत असल्यास पक्ष त्या कार्यकर्त्यांचं समर्थन करीत नाही. किंवा त्याला पक्षातही ठेवत नाही, असे स्पष्टीकरण आमदार बोदकुरवार यांनी दिले. 

No comments:

Powered by Blogger.