Latest News

Latest News
Loading...

संजय खाडे यांचा मारेगाव तालुक्यात झंझावाती प्रचार, मांगरूळ व कोलगाव येथील रॅलीने वेधले लक्ष

प्रशांत चंदनखेडे वणी 

वणी मतदार संघातील काँग्रेसचे बंडखोर उमेदवार संजय खाडे यांचा झंझावाती प्रचार सुरु आहे. अपक्ष उमेदवार म्हणून ते वणी मतदार संघात इतिहास घडविण्याच्या तयारीला लागले आहेत. विजयाचा संकल्प करून ते निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. विजयाच्या दृढ निश्चयाने ते निवडणूक लढवीत आहेत. त्यांचे मतदार संघात जोरदार प्रचार दौरे सुरु आहेत. मारेगाव तालुक्यात काल १० नोव्हेंबरला त्यांनी आपल्या समर्थकांसह प्रचाराचा झंझावात केला. मारेगाव तालुक्यातील गावागावात प्रचाराचा धुराळा उडविला. कोलगाव व मांगरूळ या गावात प्रचार रॅली काढण्यात आली. रॅलीत मोठ्या संख्येने लोकांचा सहभाग दिसून आला. आपली विकासाची ब्लु प्रिंट तयार असून मतदारांनी फक्त एकदा संधी द्यावी, असे आवाहन त्यांनी या प्रचार दौऱ्यातून मतदारांना केले. गावातील नागरिकांनीही शिट्टी वाजवून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरलेल्या संजय खाडे यांना शिट्टी हे निवडणूक चिन्ह मिळालं आहे. त्यामुळे विजयाची शिट्टी वाजविण्याचा निर्धार करून त्यांनी प्रचार दौरे सुरु केले आहेत. त्यांच्या प्रचार दौऱ्याला समर्थकांचा मोठा पाठिंबा दिसून येत आहे. कार्यकर्तेही स्वयंस्फूर्तीने प्रचार दौऱ्यात सहभागी होतांना दिसत आहेत. गाव शहरातील जनतेचाही त्यांना मोठा प्रतिसाद मिळतांना दिसत आहे. एवढेच नाही तर काँग्रेसचे नाराज नेते नरेंद्र ठाकरे, गौरीशंकर खुराणा, संजय आवारी हे देखील संजय खाडे यांच्या प्रचारार्थ मैदानात उतरले आहेत. १० नोव्हेंबरला मोरगाव तालुक्यात संजय खाडे यांचा झंझावाती प्रचार करण्यात आला. मांगरूळ या गावातून प्रचाराला सुरुवात झाली. गाव वासियांनी संजय खाडे यांच्या प्रचाराला प्रतिसाद देत त्यांचे गावात जोरदार स्वागत केले. येथील प्रचार आटपून संजय खाडे यांचा ताफा कोलगाव येथे पोहचला. कोलगाव येथील मंदिरात दर्शन घेऊन प्रचाराला सुरवात करण्यात आली. यावेळी गावातून काढण्यात आलेल्या पदयात्रेत गावातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

मांगरूळ ग्रामपंचायतीचे सरपंच प्रमोद आत्राम यांनी संजय खाडे यांना जाहीर पाठिंबा दर्शविला. संजय खाडे यांनी विधानसभा क्षेत्रात केलेल्या कार्याने प्रभावित होऊन त्यांना पाठिंबा दर्शविल्याचे सरपंचांनी यावेळी स्पष्ट केले. प्रचार सभेत बोलतांना नरेंद्र ठाकरे म्हणाले की, शेतमालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त आहेत. सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांमुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी यावेळी संजय खाडे यांच्या पाठीशी उभे राहावे. कारण संजय खाडे हे स्वतः शेतकरी आहेत. त्यामुळे ते शेतकऱ्यांच्या वेदना समजू शकतात. शेतकऱ्यांचे प्रश्न विधानसभेत खंबीरपणे मांडण्याकरिता संजय खाडे यांना विधानसभेत पाठविणे गरजेचे आहे.

गौरीशंकर खुराणा यांनी सरकारच्या लाडकी बहीण या योजनेवर टीका करतांना म्हटले की, बहिणींना ओवाळणी तर दिली पण दाजीच्या खिशातून ती काढून देखील घेतली. महागाईचा भडका उडाला आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती भरमसाठ वाढल्या आहेत. तेलाच्या किंमतीतही प्रचंड वाढ झाली आहेत. गॅस सिलेंडरचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. बहिणींच्या भाजीची फोडणीचं या महायुती सरकारने कडवट केली आहे. या हाताने द्यायचे आणि त्या हाताने हिसकायचे धोरण महायुती सरकारने अवलंबलं आहे. त्यामुळे सुज्ञ मतदारांनी आता त्यांचे डाव ओळखले पाहिजे. प्रचार दौऱ्यात संजय खाडे यांचे समर्थक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

No comments:

Powered by Blogger.