घरी एकट्या असलेल्या मुलावर हल्ला चढवून घरातील कापूस दिला पेटवून
प्रशांत चंदनखेडे वणी
घरी एकट्या असलेल्या मुलाच्या डोक्यावर काचेचा फ्लॉवर पॉट मारून त्याला जखमी करतांनाच घरात साठवून ठेवलेल्या कापसाच्या गंजीला आग लावल्याची धक्कादायक घटना मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या प्रिंप्रडवाडी येथे २७ नोव्हेंबरला दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास घडली. तोंडाला काळा रुमाल बांधून आलेल्या अज्ञात आरोपीने हे कृत्य केले. याबाबत पोलिस स्टेशनला देण्यात आलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
वामन जानकीराम वाघाडे (५२) हे प्रिंप्रडवाडी ता. झरी येथे राहतात. ते येडशी येथील जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक आहेत. त्यांना दोन मुले असून ते दोघेही शिक्षण घेत आहेत. त्यांचा लहान मुलगा आर्यन याची प्रकृती बरी नसल्याने तो दिवाळी पासून वडिलांकडे प्रिंप्रडवाडी येथे राहायला आला. २७ नोव्हेंबरला वामन वाघाडे हे येडशी येथे शाळेवर गेल्यानंतर आर्यन हा एकटाच घरी होता. दरम्यान दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास तोंडाला काळा रुमाल बांधलेला २० ते २२ वर्ष वयोगटातील तरुण त्यांच्या घरी आला. त्याने घरी एकट्या असलेल्या आर्यनवर अचानक हल्ला चढविला. घरातील काचेचा फ्लॉवर पॉट त्याने आर्यनच्या डाव्या कानाच्या मागील भागावर मारल्याने आर्यन हा चक्कर येऊन खाली पडला. त्यानंतर आरोपीने घरात साठवून असलेल्या १५ क्विंटल कापसाच्या गंजीला आग लावली. ही माहिती वामन वाघाडे यांना शेजाऱ्यांकडून मिळताच ते लगेच येडशी वरून प्रिंप्रडवाडीला आले. त्यांना घरात साठवून असलेल्या १५ क्विंटल कापसाच्या गंजीला आग लावल्याचे दिसून आले. या आगीत त्यांचा ४ ते ५ क्विंटल कापूस जळून खाक झाला असून त्यांचे ३५ ते ४० हजारांचे नुकसान झाले आहे. तसेच त्यांचा मुलगा आर्यन हा घरात जखमी अवस्थेत पडून होता. त्यांनी लगेच मुलाला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मुलावर उपचार केल्यानंतर त्यांनी मुकुटबन पोलीस स्टेशन गाठले. घडलेल्या घटनेबाबत त्यांनी पोलिस स्टेशनला रीतसर तक्रार नोंदविली. वामन वाघाडे या शिक्षकाच्या तक्रारी वरून पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध बीएनएसच्या कलम ११५(२), ३२६(१), ३३३ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास मुकुटबन पोलिस करीत आहे.
Comments
Post a Comment