शहरासह ग्रामीण भागात अवैध दारू विक्रीला उधाण, उत्पादन शुल्क विभागाची कार्यवाही मात्र शून्य


प्रशांत चंदनखेडे वणी 

शहरासह तालुक्यात अवैध दारू विक्रीला उधाण आले आहे. अवैध दारू विक्रेत्यांनी गाव शहरात आपले अड्डे थाटले आहेत. अवैध दारू विक्रेते राजरोसपणे दारू विक्री करतांना दिसत आहेत. आचार संहितेतही अवैध दारू विक्री जोमात सुरु होती. या काळात पोलिसांनी मोठ्या प्रमाणात अवैध दारू पकडली. अवैध दारू विक्रेत्यांवर कार्यवाहीचा बडगाही उगारला. मात्र उत्पादन शुल्क वणी उपविभागाचे दुय्यम निरीक्षक गपगुमान बसले आहेत. अवैध दारू विक्रीवर ते कुठल्याही प्रकारचा निर्बंध लावतांना दिसत नाही. शहरात ठिकठिकाणी अवैध दारू विक्री सुरु आहे. दिवस उजाडत तोच अवैध दारू विक्रीचे अड्डे खुलतात. पहाटेपासूनच शहरातील अवैध दारू विक्रीच्या अड्ड्यांवर मद्यपींचा घोंगाट पाहायला मिळतो. ग्रामीण भागात तर अवैध दारू विक्रेत्यांचं जाळं पसरलं आहे. अवैध दारू विक्रेत्यांनी गावखेड्यात आपले पाय घट्ट रोवले आहेत. गावात जागोजागी दारू मिळत असल्याने तरुण पिढी व मजूरवर्ग व्यसनांधतेकडे वळू लागला आहे. शहरासह ग्रामीण भागात अवैध दारू विक्रेत्यांनी कळस गाठला असतांना उत्पादन शुल्क वणी उपविभागाचे दुय्यम निरीक्षक मात्र मुकदर्शक बनले आहेत. अधिकाऱ्यांच्या मधुर संबंधांमुळे अवैध दारू विक्रेत्यांचे चांगलेच फावत आहे. 

शहरात दृष्टीस पडणार नाही अशा ठिकाणी उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय आहे. या कार्यालयाचे कोणतेही वेळापत्रक नाही. कार्यालय उघडण्याची व बंद होण्याची वेळही निश्चित नाही. वणी येथील उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाला शासनाचा कोणताही नियम लागू होत नसल्याचे दिसते. येथे अधिकाऱ्यांचा मनमर्जी कारभार सुरु आहे. नागरिकांच्या तक्रारींचेही निवारण होतांना दिसत नाही. मागील काही दिवसांत उत्पादन शुल्क विभागाकडून एकही ठोस कार्यवाही झाल्याचे दिसत नाही. शहरासह तालुक्यात असंख्य बियरबार आहेत. बियरबार उघडण्याची व बंद करण्याची नियमानुसार वेळ आखून देण्यात आली आहे. मात्र काही बियरबारमध्ये सकाळपासूनच दारू विक्री सुरु होते. बियरबाराचे मुख्य शटर बंद असले तरी छुप्या मार्गाने सर्रास दारू विक्री सुरु असते. शहरात असे अनेक बियरबार आहेत, जेथे सकाळपासूनच मद्यपींना सेवा पुरविली जाते. बियरबार चालू व बंद करतांना नियमांचे पालन होतांना दिसत नाही. मद्य अनुज्ञाप्ती धारक वेळेचे बंधन पळतांना दिसत नाही. शहरात रात्री उशिरापर्यंत बंद शटर आड बियरबार सुरु असतात. बियरबारचा एक छुपा दरवाजा मद्यपींसाठी रात्री उशिरापर्यंत खुला असतो. रात्री १२ वाजतानंतरही बियरबारमध्ये मद्यपींना सेवा पुरविली जात असतांना उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी मात्र झोपेचं सोंग घेऊन आहेत. 

ग्रामीण भागातील बियरबार तर सकाळपासूनच ग्राहकांसाठी खुले होतात. नियमांना तिलांजली देऊन वेळेआधी बिनधास्त दारू विक्री केली जाते. बियरबार धारकांना अधिकारी वर्गाची जराही भीती उरली नसल्याचे दिसून येत आहे. उत्पादन शुल्क निरीक्षकांच्या हितसंबंधांमुळे बियरबार धारक निर्धास्त झाले आहेत. कायर येथील काही बियरबारमध्ये सकाळपासूनच दारू विक्री सुरु होत असल्याच्या अनेकांच्या तक्रारी आहेत. याला गावच्या सुज्ञ व प्रमुख व्यक्तींनीही दुजोरा दिला आहे. काहींनी तर सकाळपासून रात्री उशिरापर्यंत सुरु राहणाऱ्या बियरबारचे चित्रीकरण देखील करून ठेवल्याचे म्हटले आहे. एवढेच नाही तर बंद काळातही बियरबार मधून छुप्या पद्धतीने दारू विक्री केली जात असल्याच्या देखील नागरिकांच्या तक्रारी आहेत. ग्रामीण भागातील असे अनेक बियरबार आहेत, जेथे नियमांचं कुठलंही पालन होतांना दिसत नाही. परंतु उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी याकडे डोळेझाक करतांना दिसतात. त्यामुळे त्यांच्या हितसंबंधांबाबत आता चर्चा रंगू लागल्या आहेत.  

राज्य उत्पादन शुल्क वणी उपविभागाचे दुय्यम निरीक्षक यांचा दुर्लक्षितपणा आता चर्चेचा विषय बनला आहे. अनुज्ञाप्ती धारक मद्य विक्रेते नियमांचं सर्रास उल्लंघन करीत असतांना उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक मात्र बघ्याची भूमिका घेत आहेत. त्यांच्या कर्तव्यशून्यतेमुळे अवैध दारू विक्रेत्यांबरोबरच नियमांना बगल देणाऱ्या अनुज्ञाप्ती धारकांचंही मनोबल वाढलं आहे. दारू विक्रीची दुकाने (वाईन शॉप) रात्री १० वाजता बंद करण्याचा नियम असतांना ही दुकाने १०.३० वाजेपर्यंत सुरु असतात. बियर शॉपीही रात्री उशीरापर्यंत सुरु असतात. बियर शॉपीमध्ये बीयर पिण्याचीही मुभा दिली जाते. बियर शॉपीमध्येच मद्य सेवन केले जात असल्याने बियर शॉपीला बियरबारचे स्वरूप आले आहे. रेस्टोरंट व ढाब्यांवरही दारूच्या मैफिली रंगताना दिसतात. ढाब्यांवर बिनधास्त दारू पार्ट्या केल्या जातात. शहरातील सुभासचंद्र बोस चौक येथे अवैध दारू विक्रीचा अड्डाच तयार झाला आहे. सकाळपासून तर रात्री उशिरापर्यंत येथे अवैधरित्या दारू विक्री केली जाते. तालुक्यातील शिंदोला येथे दोन ते तीन ठिकाणी अवैध दारू विक्रीचे अड्डे थाटण्यात आले आहे. परवाना असलेल्या दारूच्या दुकानांप्रमाणेच येथे अवैध दारू विक्री केली जाते. एवढेच नाही तर शहरात ठिकठिकाणी व गावखेड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री सुरु आहेत. परंतु उत्पादन शुल्क वणी उपविभागाचे दुय्यम निरीक्षक मात्र अवैध दारू विक्रेत्यांवर कुठलीही कार्यवाही करतांना दिसत नाही. त्यामुळे त्यांच्या हितसंबंधांची चर्चा आता नागरिकांमध्ये रंगू लागली आहे. 

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी