डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय सुरु न झाल्यास आमरण उपोषण, वणीकर जनतेचा इशारा
प्रशांत चंदनखेडे वणी
शहराच्या मध्यभागी असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय मागील अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. नगर पालिका हे वाचनालय सुरु करण्याकडे जराही लक्ष देतांना दिसत नाही. हे वाचनालय पूर्णतः दुर्लक्षित असून या वाचनालयाची अक्षरशः दुरावस्था झाली आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय लवकरात लवकर सुरु करण्याची मागणी वणीतील सुज्ञ नागरिकांनी नगर पालिका मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
नगर पालिकेच्या दुर्लक्षितपणामुळे वणीतील नामांकित वाचनालय मागील अनेक वर्षांपासून बंद पडले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय हे अतिशय जुने वाचनालय आहे. या वाचनालयात वाचकांची नेहमी वर्दळ असायची. वृत्तपत्र वाचनाची आवड असलेले नागरिक याठिकाणी रमायचे. वाचनाबरोबरच नागरिकांच्या वैचारिक चर्चाही व्हायच्या. अनेक विषयांवर त्यांच्या चर्चा रंगायच्या. त्यातूनच नवनवीन कल्पनाही जन्माला यायच्या. मात्र हे वैचारिक व्यासपीठच बंद पडलं आहे. नगर पालिकेच्या दुर्लक्षित धोरणांचा फटका या वाचनालयाला बसला आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय शीघ्र सुरु करतांनाच या वाचनालयात सर्व सोइ सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी वणीकर जनतेने नगर पालिका मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. ६ डिसेंबर पर्यंत हे वाचनालय सुरु न झाल्यास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर आमरण उपोषण करण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदन देतांना बबलू मेश्राम, प्रविण खानझोडे, रविंद्र कांबळे, किशोर मुन, पी.के. टोंगे, महेश टिपले, शेख मोहंमद अल कमल, अजय खोब्रागडे, सचिन टिपले, सुरज उपरे यांच्यासह शहरातील नागरिक उपस्थित होते.
Comments
Post a Comment