वणी मतदार संघात महाविकास आघाडीच्या संजय देरकर यांचा १५५६० मतांनी विजय, महायुतीच्या उमेदवाराचा विजयी रथ रोखला

प्रशांत चंदनखेडे वणी 

विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून वणी मतदार संघातून महाविकास आघाडीचे शिवसेना गटाचे उमेदवार संजय देरकर हे विजयी झाले आहेत. त्यांनी आपले प्रतिस्पर्धी उमेदवार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचा १५  हजार ५६० एवढ्या मताधिक्याने पराभव केला आहे. विधानसभेच्या सलग (२०१४, २०१९) दोन पंचवार्षिक निवडणुकीत विजय संपादन करणाऱ्या संजीवरेड्डी बोदकुरवार यांना २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला आहे. वणी विधानसभा मतदार संघात ते विजयाची हायट्रीक करतील असा अंदाज बांधला जात होता. मात्र संजय देरकर यांच्या झंझावाताने त्यांच्या विजयाची घौडदौड रोखली. संजय देरकर यांना वणी विधानसभा मतदार संघातून रेकॉर्ड ब्रेक मते मिळाली आहेत. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशा रंगलेल्या या निवडणुकीच्या सामन्यात संजय देरकर यांनी संजीवरेड्डी बोदकुरवार यांचा १५ हजार ५६० मतांनी पराभव केला. संजय देरकर यांना ९४ हजार ६१८ मते मिळाली तर संजीवरेड्डी बोदकुरवार यांना ७९ हजार ५८ मते मिळाली आहेत. 

महाविकास आघाडीचे संजय देरकर यांनी पहिल्या फेरी पासूनच मतांची आघाडी घेतली. त्यांनी घेतलेली आघाडी शेवटच्या फेरी पर्यंत कायम राहिली. दोन्हीही बलाढ्य उमेदवारांमध्ये चुरशीच्या झालेल्या या लढतीतीत शेवटी संजय देरकर यांनी संजीवरेड्डी बोदकुरवार यांचा पराभव केला. संजीवरेड्डी बोदकुरवार यांचा विजयी रथ रोखण्यात संजय देरकर यांना यश आलं आहे. वणी विधानसभा मतदार संघात महायुतीच्या उमेदवाराला तारण्यात लाडक्या बहिणींचं प्रेम कमी पडल्याच्या चर्चा आता रंगत आहेत. वणी मतदार संघात ओबीसी मतदारांचं प्राबल्य राहिलं आहे. त्यांचा पूर्ण कल यावेळी संजय देरकर यांच्या बाजूने झुकल्याचे पाहायला मिळाले. त्यातच महाविकास आघाडी कडून उमेदवारी मिळाल्याने काँग्रेसच्याही नेत्यांनी त्यांच्या विजयात पूर्ण ताकद झोकली. पूर्ण ताकदीनिशी काँग्रेसचे नेते त्यांच्या प्रचारार्थ मैदानात उतरले होते. त्यातच पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जंगी प्रचार सभेने वातावरण बदलविले. काही अनपेक्षित घडामोडीही वणी मतदार संघात घडल्या. त्याचाही संजय देरकर यांना मोठा लाभ मिळाला. मतदार संघातील काही विवादास्पद घटना घडामोडी महायुतीच्या उमेदवाराच्या पथ्यावर पडल्याचे आता खुल्या आवाजात बोलले जात आहे. 

वणी विधानसभा मतदार संघातून एकूण १२ उमेदवारांनी निवडणूक लढविली. यात संजय खडे हे तगडं आव्हान उभं करतील अशी शक्यता वर्तविली जात होती. त्यांच्या उमेदवारीने महाविकास आघाडीचं गणित बिघडेल असाही तर्क लावण्यात येत होता. त्यांच्या बंडखोरीने महाविकास आघाडीला मतविभाजनाचा फटाका बसणार असल्याचेही भाकीत वर्तविण्यात येत होते. मात्र मतदार संघात प्रचाराचा धुराळा उडवुनही ते मतदारांवर आपली छाप पाडू शकले नाही. त्यांना अपेक्षेपेक्षा अतिशय कमी (७५४०) मते मिळली. तसेच मनसेचे राज्य नेते राजू उंबरकर हे यावेळी कडवी झुंज देतील असेही वाटत होते. परंतु त्यांचाही प्रभाव मतदारांवर पडू शकला नाही. विजयाच्या इराद्याने यावेळी ते निवडणूक रिंगणात उतरले होते. त्यांनी मतदार संघात प्रचारही जोरदार केला. मनसे सैनिकांनीही त्यांच्या प्रचारासाठी संपूर्ण मतदार संघ पिंजून काढला होता. परंतु मतदारांचा कौल मिळविण्यात त्यांना यश आले नाही. राजू उंबरकर यांना २१९७७ मते मिळाली आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारानेही या निवडणुकीत पक्षाला साजेसं मतदान घेतलं नाही. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत वंचितला १५ हजारांच्यावर मते मिळाली होती. तर या निवडणुकीत वंचितला ३६०५ मते मिळाली  आहेत. त्यामुळे या निवडणुकीत मतांची गोळाबेरीज जुळविण्यात वंचितच्या नेत्यांना यश आल्याचे दिसत नाही. त्यात बहुजन समाज पार्टीचे अरुण कुमार खैरे (११६३). भाकपचे अनिल हेपट (३८७५), अपक्ष राहुल आत्राम (२५३२), हरीश पाते (१३०७), नारायण गोडे ८५५), निखिल ढुरके (२२४६), केतन पारखी (४०७) यांना मतदारांच्या पसंती नुसार मते मिळाली आहेत. तर नोटाला १३३५ मते मिळाली आहेत. 

महाविकास आघाडीने महागाई, बेरोजगारी व शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर निवडणूक लढली. वणी मतदार संघातही हेच मुद्दे समोर करून संजय देरकर यांनी प्रचारातून रान उठविले. परिवर्तनाचा आवाज त्यांनी वणी मतदार संघात बुलंद केला. त्यांना मतदारांचा प्रचंड प्रतिसादही मिळाला. वणी मतदार संघात शिवसेनेने डरकाळी फोडली. पण महाराष्ट्रात चित्र काही वेगळंच राहिलं. त्यामुळे वणी मतदार संघात विजयाचा झेंडा रोवला पण महाराष्ट्राचा गड राखण्यात अपयश आलं, असे म्हणण्याची वेळ समर्थकांवर आली आहे. असे असले तरी संजय देरकर यांच्या विजयाचा शिवसैनिकांकडून प्रचंड जल्लोष करण्यात आला. विजयी गुलाल उधळून शिवसैनिकांसह महाविकास आघाडीने एकच जल्लोष केला. विजय निश्चित झाल्यानंतर संजय देरकर यांनी सर्वप्रथम जगन्नाथ महाराजांचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हारार्पण करून अभिवादन केले. नंतर त्यांची शहरातून विजयी रॅली काढण्यात आली. 

वणी मतदार संघात महाविकास आघाडीने आपली प्रतिष्ठा राखली. महाविकास आघाडीची एकजूट विजयाची शिल्पकार ठरली आहे. महाविकास आघाडीतील दिग्गज व अनुभवी नेत्यांनी आखलेली रणनीती यशस्वी ठरली आहे. संजय देरकर यांना रेकॉर्ड ब्रेक मतदान झाले. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ६७ हजार ७१० मते घेऊन संजीवरेड्डी बोदकुरवार हे विजयी ठरले होते. तर २०२४ च्या या विधानसभा निवडणुकीत ७९ हजार ५८ मते मिळूनही त्यांचा पराभव झाला आहे. संजय देरकर यांनी ९४ हजार ६१८ मते घेऊन त्यांचा १५  हजार ५६० मतांनी पराभव केला आहे. विशेष म्हणजे मागील विधानसभा निवडणुकीत अपक्ष उभे असतांना संजय देरकर यांना २५ हजार ४५ मते मिळाली होती. तर आता त्यांनी भरगच्च मते घेऊन वणी विधानसभा मतदार संघात विजयाचा झेंडा रोवला आहे.


Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी