प्रशांत चंदनखेडे वणी
दारुड्या पतीने पत्नीशी वाद घालून तिच्यावर कुऱ्हाड उगारली. मात्र पत्नीने प्रसंगावधान राखून प्रतिकार केल्याने पुढील अनर्थ टळला. परंतु प्रतिकार करतांना पत्नीला कुऱ्हाडीचा मार लागल्याने ती जखमी झाली आहे. याबाबत तिने आपल्या दारुड्या पती विरुद्ध पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविली असून पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना पाटण पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या झरी येथे २७ नोव्हेंबरला रात्री ११.३० वाजताच्या सुमारास घडली.
झरी येथे परिवारासह राहत असलेल्या वैष्णवी गजानन तांडुरवार (३०) यांच्या तक्रारी नुसार त्यांचे पती गजानन पुंडलिक तांडुरवार (३७) हे दारूचे व्यसनी आहेत. ते दररोज दारू पियुन घरी येतात व विनाकारण वाद घालतात. २०१५ साली त्यांचा गजानन याच्याशी रितीरिवाजा प्रमाणे विवाह झाला. त्यानंतर त्यांना दोन मुले झाली. परंतु गजाननला असलेल्या दारूच्या व्यसनामुळे संसारिक जीवनात कधीच सुखशांती नांदली नाही. संसारात नेहमीच कलह निर्माण व्हायचा. पती दारू पियुन आला की विनाकारण भांडण करायचा. २७ नोव्हेंबरलाही रात्री ११.३० वाजताच्या सुमारास गजानन हा नेहमी प्रमाणे दारूच्या नशेत तर्रर्र होऊन घरी आला. त्याने पत्नीशी वाद घालत तिच्यावर कुऱ्हाड उगारली. मात्र पत्नीने प्रसंगावधान राखत गजानन जवळील कुऱ्हाड दोन्ही हातांनी घट्ट पकडली. पूर्ण ताकदीने तिने गजानन जवळील कुऱ्हाड हिसकण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत वैष्णवीच्या हाताला व काखेजवळ कुऱ्हाडीचा मार लागल्याने ती जखमी झाली आहे. रात्री गजानन व वैष्णवी यांच्यात सुरु असलेला कलह कुटुंबियांच्या कानावर पडताच त्यांनी लगेच मध्यस्थी करीत त्यांचा वाद सोडविला. परंतु पती जीवावर उठल्याचे पाहून वैष्णवीला चांगलाच धक्का बसला. पतीच्या या कृत्याने तीच्या अंगाचा थरकाप उडाला. त्यामुळे २८ नोव्हेंबरला तिने पाटण पोलिस स्टेशन गाठून पती विरुद्ध तक्रार नोंदविली. तसेच पती पासून तिच्या जिवीताला धोका असल्याचेही तिने तक्रारीत म्हटले आहे. वैष्णवी तांडुरवार यांच्या तक्रारी वरून पोलिसांनी पती गजानन तांडुरवार याच्या विरुद्ध बीएनएसच्या कलम ११८(१), ३५२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पाटण पोलिस करीत आहे.
No comments: