संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी तारेंद्र बोर्डे यांच्यावर फोडले पराभवाचे खापर, पत्रकार परिषदेतून केला थेट आरोप
प्रशांत चंदनखेडे वणी
वणी विधानसभा मतदार संघातून पराभूत झालेले भाजपचे उमेदवार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी आपल्या पराभवाचे खापर भाजपचे जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांच्यावर फोडले आहे. आधी त्यांनी तारेंद्र बोर्डे यांचं नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला होता. तर आता त्यांनी पत्रकार परिषद घेऊन तारेंद्र बोर्डे यांच्यावर थेट आरोप केला आहे. तारेंद्र बोर्डे यांनी माझ्या विरोधात प्रचार केल्याने मला पराभवाचा सामना करावा लागल्याची स्पष्टोक्ती माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी दिली. पक्षांतर्गत झालेल्या खेळीनेच विजयाची हायट्रीक हुकल्याची खंत माजी आमदार बोदकुरवार यांनी व्यक्त केली. मतदार संघातील विकासकामांमुळे नागरिक समाधानी होते. त्यामुळे त्यांचा पूर्ण कौल भाजपला होता. परंतु पक्षात राहून दगाबाजी करणाऱ्या जिल्हाध्यक्षांनी माझ्या विरोधात खोटा प्रचार केला. त्यामुळे माझ्यावर पराभवाला सामोरे जाण्याची नामुष्की ओढावली असा खळबळजनक खुलासा बोदकुरवार यांनी पत्रकार परिषदेत केला. पक्षातील गद्दारांच्या कटकारस्थानामुळे निवडणुकीत पराभव झाला असला तरी मतदार संघातील विकासकामे थांबू देणार नाही, अशी ग्वाही माजी आमदार बोदकुरवार यांनी पत्रकार परिषदेतून दिली. पुढील प्रवासाकरिता आणखी जोमाने कामाला लागणार असल्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत वणी मतदार संघातून भाजपचे उमेदवार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचा पराभव झाला. महाविकास आघाडीचे शिवसेना गटाचे उमेदवार संजय देरकर यांनी त्यांचा १५ हजार ६१४ मतांनी पराभव केला. १० वर्षे वणी मतदार संघाचे आमदार असलेले बोदकुरवार हे या निवडणुकीत अनपेक्षितपणे पराभूत झाल्याने त्यांना दुःखं अनावर झालं. त्यांचं दुःखं अश्रूंच्या रूपात डोळ्यातून झळकलं देखील. पराभवानंतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधतांना ते धायमोकळून रडले. त्यांच्या डोळ्यातून सतत अश्रूंच्या धारा वाहत होत्या. यावेळी त्यांच्या भावना उफाळून आल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी आपल्या पराभवाचे खापर थेट भाजपच्या जिल्हाध्यक्षावर फोडले. त्यावेळीही नाव न घेता त्यांनी तारेंद्र बोर्डे यांच्यावर निशाणा साधला होता. तर १ डिसेंबरला त्यांच्याच निवासस्थानी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत तारेंद्र बोर्डे हेच आपल्या पराभवाला कारणीभूत असल्याचा थेट आरोप त्यांनी केला आहे. निश्चित असलेला विजय तारेंद्र बोर्डे यांच्या विरोधातील प्रचाराने पराभवात बदल्याचे संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी जाहीरपणे म्हटले आहे. त्यामुळे आता गद्दारांना पक्षात थारा मिळणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
पराभवानंतर आरोपांची लाखोळी वाहतांनाच बोदकुरवार यांनी ८० हजार मतदारांनी आपल्यावर विश्वास दाखविल्याने आता पुढील वाटचालीकरिता जोमाने कामाला लागणार असल्याचा निर्धार व्यक्त केला. नागरिकांची कामे करण्याला प्राथमिकता देतांनाच विकासाची गती वाढविण्यावर अधिक भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले. विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही. भलेही श्रेय विद्यमानांना मिळाले तरी चालेल, असेही ते म्हणाले. वणी विधानसभा क्षेत्राच्या विकासाकरिता नेहमी कटिबद्ध राहणार असल्याचे बोदकुरवार यांनी यावेळी स्पष्ट केले. लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका लागतील. त्यामुळे आता या निवडणुकांकडे लक्ष केंद्रित करून जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर पालिकेत आपल्या पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याचा आपण प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी पत्रकार परिषदेत आवर्जून सांगितले. पत्रकार परिषदेला दिनकर पावडे, विजय पिदूरकर, रवि बेलुरकर, संजय पिंपळशेंडे, गजानन विधाते, नितीन वासेकर आदी उपस्थित होते.
No comments: