शेताजवळ रस्त्याच्या कडेला उभी असलेली मोटारसायकल अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना ९ डिसेंबरला सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घडली. याबाबत पोलीस स्टेशनला देण्यात आलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
शहरासह तालुक्यात दुचाकी चोरीच्या घटना वाढू लागल्या आहेत. चोरटे पळत ठेऊन दुचाक्या लंपास करू लागले आहेत. दुचाकी चोरीच्या घटनांवर अंकुश लावण्यात व दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांचं तपास कौशल्य कमकुवत ठरताना दिसत आहे. शेताजवळ उभी असलेली शेतकऱ्याची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. नांदेपेरा वनोजादेवी रस्त्यावर विजय नानाजी टोंगे (४०) यांचं शेत आहे. सकाळी १०.३० वाजता ते दुचाकीने शेताकडे गेले. दुचाकी रस्त्याच्या कडेला उभी करून ते शेतातील कामे करण्याकरिता गेले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी लंपास केली. शेतातील कामे आटपून ते दुचाकी ठेवलेल्या ठिकाणी परतल्यानंतर त्यांना तेथे दुचाकी आढळून आली नाही. त्यांनी दोन दिवस दुचाकीचा सर्वत्र शोध घेतल्यानंतर १२ डिसेंबरला दुचाकी (MH २९ BG ९३०१) चोरी गेल्याची तक्रार पोलिस स्टेशनला नोंदविली. विजय टोंगे यांच्या तक्रारी वरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध बीएनएसच्या कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास जमादार अविनाश बनकर करीत आहे.
No comments: