निवडणूक संपली आता हेवेदावे विसरून गावाच्या विकासाला प्राधान्य द्या : आमदार संजय देरकर
प्रशांत चंदनखेडे वणी
वणी विधानसभा क्षेत्राचा विकास हेच माझं उद्दिष्ट आहे. या मतदार संघातील प्रत्येक गावाच्या विकासाकरिता मी पूर्णपणे सहकार्य व मदत करणार आहे. त्यामुळे गावच्या सरपंचांनी निसंकोच माझ्याशी गावातील समस्यांबाबत चर्चा करावी. सरपंचांसाठी माझ्या घराचे व कार्यालयाचे दरवाजे नेहमी खुले असतील. गावाचा विकास व समस्यांचं निराकरण करण्यासाठी मी सदैव तत्पर राहील. आता निवडणूक संपली आहे. त्यामुळे कोणता सरपंच कोणत्या पक्षाचा आहे, व तो कोणत्या पक्षाचा समर्थक आहे, हा भेदभाव माझ्याकडून कधीच होणार नाही. त्यामुळे हेवेदावे विसरून गावाचा विकास कसा साधता येईल यावर आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे, असं उद्बोधक वक्तव्य आमदार संजय देरकर यांनी केलं. ते महाराष्ट्र प्रदेश सरपंच संघटना वणी तालुक्याच्या वतीने बी.आर.जी.एफ हॉल येथे आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते.
सरपंच संघटनेच्या वतीने नवनिर्वाचित आमदार संजय देरकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. आपल्या सत्काराला उत्तर देतांना त्यांनी सरपंच संघटनेचे आभार व अभिनंदन केले. गावातील अडचणी व समस्या सोडविण्याकरिता आमदार म्हणून मी तुमच्या पाठीशी उभा आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या सर्व सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी गावाच्या विकासाकरिता एकत्र येऊन कार्य करण्याची गरज असल्याचे विचार त्यांनी यावेळी व्यक्त केले. तसेच बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावच्या सरपंचाची निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या घटनेचा त्यांनी यावेळी तीव्र निषेध केला. कार्यक्रमाला वणी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी किशोर गज्जलवार हे प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रविण झाडे, सचिव गीता उपरे, कार्याध्यक्ष अनिल देऊळकर, उपाध्यक्ष नागेश धनकसार यांच्यासह सरपंच संघटनेचे सर्वच पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. त्याचबरोबर व्याख्यान प्रशिक्षक समीर लेनगुळे, राजेंद्र इद्दे, डॉ. जगन जुनगरी यांचीही यावेळी उपस्थिती होती. आमदार संजय देरकर यांनी ज्या गावचा सरपंच व तेथील नागरिक आपलं गाव स्वच्छ, सुंदर व नीटनेटकं ठेवेल त्या गावाला विशेष पुरस्कार देण्यात येणार असल्याचेही यावेळी जाहीर केले. या कार्यक्रमाला सरपंच, उपसरपंच व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment