शिवसेना (उबाठा) व संविधान जागर सन्मान मंचचे शहरात निषेध आंदोलन
प्रशांत चंदनखेडे वणी
भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल खेदजनक वक्तव्य केल्याने त्याचे पडसाद संपूर्ण देशात उमटले आहेत. देशभरातून त्यांच्या या वक्तव्याचा निषेध होत असून त्यांच्या राजीनाम्याची देखील मागणी होऊ लागली आहे. वणी शहरातही आज त्यांच्या या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यात आला. शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी अमित शहा यांच्या विरोधात तीव्र निदर्शने देतांनाच त्यांच्या राजीनाम्याची देखील शिवसेनेकडून मागणी करण्यात आली. शिवसेनेच्या किरण देरकर, संजय निखाडे, सुनिल कातकडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. त्याचप्रमाणे संविधान जागर सन्मान मंच वणीच्या वतीनेही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. अमित शहा यांचं बाबासाहेबांबद्दलचं अपमानजनक वक्तव्य व परभणी येथील संविधान शिल्पाची झालेली विटंबना तथा सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलिसांच्या मारहाणीत पोलिस कोठडीत झालेल्या मृत्यूच्या निषेधार्थ हे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
परभणी येथे संविधान शिल्पाची समाज कंटकाकडून विटंबना करण्यात आल्यानंतर जनआक्रोश उमळला. या घटनेच्या निषेधार्थ संविधानिक मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंबेडकरी जनतेला कोम्बिंग ऑपरेशन करून अमानुष मारहाण करण्यात आली. तसेच महिलांनाही बेदम मारहाण करण्यात आली. अशातच विधीचं शिक्षण घेणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी या आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्याला अटक करून पोलिसांनी त्याला बेदम मारहाण केली. यात त्याचा पोलिस कोठडीतच मृत्यू झाला. संविधान शिल्पाची विटंबना करणाऱ्या सुत्राधारांचा शोध न घेता आंबेडकरी जनतेलाच कोम्बिंग ऑपरेशन करून मारहाण करणाऱ्या पोलिसांविरुद्ध संपूर्ण देशातून रोष व्यक्त होत असतांनाच सरकारच्या भूमिकेवरही प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे. शाहिद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलिस कोठडीत झालेल्या मृत्यूची चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीला घेऊन संपूर्ण देशभरात मोर्चे व आंदोलनं होत आहेत. त्यातच देशाच्या जबाबदार पदावर असलेल्या गृहमंत्री अमित शहा यांनी देशाच्या घटनाकाराबाबत अपमानजनक वक्तव्य करून देशवासीयांच्या संतापात आणखीच भर घातली. अमित शहा यांच्या वक्तव्याने सामाजिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या अपमानजनक वक्तव्यामुळे संपूर्ण देश पेटला आहे. विषमतावादी वक्तव्य करणाऱ्या अमित शहा यांच्या बद्दल लोकांमध्ये तीव्र आक्रोश दिसून येत आहे. ठिकठिकाणी त्यांच्या पुतळ्याचे दहन केले जात आहे. त्यांच्या विरोधात तीव्र निदर्शने व घोषणा दिल्या जात आहे. त्यांच्या खेदजनक व्यक्तव्याचा संविधानप्रेमी जनतेतून तीव्र निषेध करण्यात येत असून त्यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली जात आहे.
अमित शहा यांनी बाबासाहेबांबद्दल केलेल्या अपमानजनक वक्तव्याचे लोन आज वणी शहरातही पसरले. शिवसेना (उबाठा) पक्षाकडून अमित शहा यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यात आला. तसेच त्यांच्या विरोधात जोरदार घोषणा देऊन त्यांच्या राजीनाम्याची देखील शिवसेनेकडून मागणी करण्यात आली. त्याचबरोबर संविधान जागर सन्मान मंच वणीच्या वतीने परभणी येथील संविधान शिल्पाची विटंबना, सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलिस कोठडीत झालेला मृत्यू व अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल केलेलं अपमानजनक वक्तव्य याच्या निषेधार्थ एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं. शिवसेनेकडून करण्यात आलेल्या निषेध आंदोलनात शिवसेनेच्या किरण देरकर, संजय निखाडे, सुनिल कातकडे, दीपक कोकास, अजिंक्य शेंडे (युवासेना), भगवान मोहिते, संजय देठे, प्रवीण खानझोडे, बबलू मेश्राम, सुरेश शेंडे, गणेश जुनघरे, यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर संविधान जागर सन्मान मंच वणीच्या वतीने करण्यात आलेल्या एक दिवसीय धरणे आंदोलनात प्रा. पुरुषोत्तम पाटील, सुरेश रायपुरे, श्रीकृष्ण सोनारखन, रविंद्र कांबळे, ऍड. दिलीप परचाके, ऍड. विप्लव तेलतुंबडे, चंद्रमणी दसोडे, शिवाजी दुपारे, हरीश पाते, देवानंद झाडे, पुखराज खैरे, प्रशांत गाडगे, रज्जत सातपुते, वाघ, सत्तार, उंदीरवाडे, करुणा कांबळे, रेखा पाटील, लोहकरे, शाणूका लभाने, कुळसंगे, काजल वाळके, नीलम नगराळे, यांच्यासह आंबेडकरी अनुयायी व संविधानप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment