वाळू चोरी करणारा ट्रॅक्टर पोलिसांनी पकडला
प्रशांत चंदनखेडे वणी
विना परवाना रेतीची वाहतूक करणारा ट्रॅक्टर पोलिसांनी पकडला. ही कार्यवाही शनिवार दि. २१ डिसेंबरला दुपारी १.१५ वाजताच्या सुमारास नांदेपेरा चफुलीवर करण्यात आली. रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
रेती घाटांवरून मोठ्या प्रमाणात रेतीची चोरी केली जात आहे. अवैधरित्या रेतीचे उत्खनन करून काळ्या बाजारात दामदुप्पट किमतीत रेतीची विक्री केली जात आहे. वाळू चोरटे शहरात मोठ्या प्रमाणात सक्रिय असून महसूल विभागाच्या डोळ्यात धूळ झोकून ते सर्रास रेतीची चोरी करीत आहेत. गौण खनिजाच्या चोरीतुन चोरटे मालामाल झाले आहेत. तर प्रशासन कार्यवाहीत ढील देत असल्याने शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. चोरटेच शासनाच्या महसुलावर डल्ला मारत असल्याचे चित्र तालुक्यात पाहायला मिळत आहे. अशाच एका वाळू चोरी करणाऱ्या ट्रॅक्टरवर पोलिसांनी कार्यवाही करून वाळू भरलेला ट्रॅक्टर ताब्यात घेतला आहे. नांदेपेरा मार्गाने अवैधरित्या रेतीची वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहिती वरून पोलिसांनी नांदेपेरा चौफुलीवर सापळा रचला. दरम्यान नांदेपेरा मार्गाने एक ट्रॅक्टर पोलिसांना येतांना दिसला. त्या ट्रॅक्टरला थांबवून ट्रॅक्टरची तपासणी केली असता त्यात वाळू आढळून आली. चालकाला वाळू कुठून आणली असे विचारले असता तो उडवायडवीची उत्तरे देऊ लागला. तसेच त्याच्याकडे रेती वाहतुकीचा परवानाही नसल्याने पोलिसांनी रेती भरलेला ट्रॅक्टर (MH २९ CB ८३१६) ताब्यात घेऊन पोलिस स्टेशनला लावला. तसेच ट्रॅक्टर चालक गणेश नंदकिशोर गोहोकार याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहे.
Comments
Post a Comment