पद्मावती नगर येथे घरफोडी, १ लाख ९२ हजारांची रोख रक्कम चोरट्यांनी केली लंपास
प्रशांत चंदनखेडे वणी
शहरातील पद्मावती नगर येथे घरफोडी करून चोरट्यांनी १ लाख ९२ हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेल्याची घटना २३ डिसेंबरला उघडकीस आली. याबाबत पोलिस स्टेशनला देण्यात आलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
शहरात चोरी व घरफोडीच्या घटना दिवसेंदिवस वाढू लागल्या आहेत. चोरटे परत शहरात धुमाकूळ घालू लागले आहेत. चोरीच्या वाढत्या घटनांमुळे शहरवासी धास्तीत आले आहेत. गुन्हेगारी प्रवृत्तीने डोके वर काढण्यास सुरुवात केली असून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांचं नेटवर्क कमी पडतांना दिसत आहे. चोरटे बंद घरांना टार्गेट करू लागल्याने शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पद्मावती नगर येथे वास्तव्यास असलेल्या निखिल बाळकृष्ण झाडे (३३) यांच्या बंद घराला चोरट्यांनी टार्गेट केले. निखिल झाडे यांचं पद्मावती नगर येथे दुमजली मकान आहे. तळमजल्यावर निखिल झाडे हे कुटुंबासह राहतात. तर वरच्या माळ्यावर त्यांची बहीण राहते. निखिल झाडे हे २२ डिसेंबरला वडिलांच्या उपचाराकरिता नागपूरला गेले असता चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाटात व सुटकेसमध्ये ठेऊन असलेल्या १ लाख ९२ हजार रुपयांच्या रोख रक्कमेवर चोरट्यांनी हात साफ केला.
तळमजल्यावर चोरी करतांना चोरट्यांनी वरच्या माळ्यावर राहणाऱ्या त्यांच्या बहिणीच्या घराच्या दरवाजाची देखील बाहेरून कडी लावली. सकाळी त्यांच्या बहिणीने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला असता दरवाजा बाहेरून बंद असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी शेजाऱ्यांना फोन केला. शेजारी त्यांच्या घरी आले असता त्यांना निखिल यांच्या घराचाही दरवाजा खुला दिसला. शेजाऱ्यांनी वरच्या माळ्यावरील बाहेरून बंद असलेले दार उघडतांनाच निखिल यांच्या घराचाही दरवाजा खुला असल्याचे त्यांच्या बहिणीला सांगितले. यावरून त्यांच्या बहिणीला निखिल यांच्या घरी चोरी झाल्याचा संशय आला. त्यांच्या बहिणीने लगेच निखिल यांना फोन करून ही माहिती दिली. निखिल झाडे हे घरी परतले असता त्यांना घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. कपाटात व सुटकेसमध्ये ठेऊन असलेली रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी पोलिस स्टेशनला येऊन घरी चोरी झाल्याची तक्रार नोंदविली. निखिल झाडे यांच्या तक्रारी वरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध बीएनएसच्या कलम ३०५ (A), ३३१(४) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहे.
Comments
Post a Comment