शहरात बौद्ध धम्मीय युवक-युवती परिचय मेळाव्याचे आयोजन
प्रशांत चंदनखेडे वणी
शहरातील भिमनगर येथील बुध्दविहारात २९ डिसेंबरला सकाळी १० वाजता बौद्ध धम्मीय युवक - युवती परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. बहुउद्देशीय बौद्ध धम्मीय मनोमिलन डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक कार्य वणीच्या वतीने हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. अविवाहित, विधुर, विधवा व घटस्फोटित युवक युवतींना या मेळाव्याचा लाभ घेता येणार आहे.
मेळाव्याच्या उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्ष धर्मपाल माने (यवतमाळ) हे राहणार असून उद्घाटक म्हणून विवेक मेश्राम (वर्धा) यांची उपस्थिती लाभणार आहे. प्रा. गौतम जिवने हे या मेळाव्याचे प्रमुख मार्गदर्शक असणार आहेत. तर प्रमुख अतिथी म्हणून पंढरीनाथ आडे (वर्धा), सदाशिवराव भालेराव (यवतमाळ), अशोकराव इंगोले (बीडीओ यवतमाळ), दिलीप दुर्गे, सिता वाघमारे (एपीआय वाहतूक उपविभाग), करुणा सिरसाठ (यवतमाळ), विलास वाघमारे, नागोराव ढेंगळे, पुखराज खैरे हे उपस्थित राहणार आहेत.
उप वर-वधुंनी या मेळाव्याचा लाभ घेण्याकरिता वेळेत नोंदणी करणे बंधनकारक आहे. नोंदणीची वेळ सकाळी १० ते ११ वाजेपर्यंत राहील. डायरी किंवा वही व पेन सोबत आणावी असेही सांगण्यात आले आहे. धकाधकीच्या या जीवनात विविहासाठी योग्य स्थळ शोधणे कठीण होऊ लागले आहे. त्यामुळे युवक युवतींचे विवाह खोळंबले जात आहे. कधी योग्य स्थळ मिळत नाही तर कधी स्थळ शोधण्यातच दिवस उलटतात. त्यामुळे युवक युवतींचं वयही वाढत जातं. विवाहयोग्य युवक युवतींचे विवाहाचे योग जुळून यावे या दृष्टिकोनातून वणी येथे या सार्वजनिक उप वर-वधू परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. याच निमित्ताने समाज बांधवांच्याही भेटीगाठी होऊन त्यांच्यात एकोपा वाढेल. या मेळाव्यात बौद्ध धम्मीय युवक युवतींनी आपली नावे नोंदवून मेळाव्याचा मोठ्या प्रमाणात लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. कार्याध्यक्ष सुहास नगराळे (9850453518) यांच्याकडे युवक युवतींना आपल्या नावाची नोंदणी करता येणार आहे. मेळाव्यात नाव नोंदविलेल्या युवक युवतींसह त्यांच्या पालकांनाही या मेळाव्यात उपस्थित राहता येणार आहे.
Comments
Post a Comment