व्ह्रदयद्रावक घटना, कोळसा भरलेल्या ट्रकवरून पडून चालकाचा दुर्दैवी मृत्यू
प्रशांत चंदनखेडे वणी
कोळसा वाहतुकीच्या ट्रकवरून खाली पडल्याने चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची व्ह्रदयद्रावक घटना आज २४ डिसेंबरला पहाटेच्या सुमारास वरोरा तालुक्यातील साई वर्धा पॉवर प्रा.लि. येथे घडली. कोळसा भरलेल्या ट्रकवर चढून ताडपत्री सोडत असतांना ताडपत्रीचा दोर तुटल्याने चालकाचा तोल गेला व तो ट्रक वरून खाली पडला. यात त्याला जबर मार लागल्याने त्याचा रुग्णालयात हलविताना मृत्यू झाला. हरिदास साठे (५३) रा. मांजरी जि. चंद्रपूर असे या दुर्दैवी मृत्यू ओढवलेल्या चालकाचे नाव आहे.
पंजाब ट्रान्सपोर्ट कंपनीमध्ये कोळसा वाहतुकीच्या वाहनावर मागील अनेक वर्षांपासून चालक म्हणून काम करणारे हरिदास साठे हे २३ डिसेंबरला नेहमी प्रमाणे ट्रान्सपोर्ट कंपनीचे वाहन घेऊन कोळसाखाणीत गेले. कोळसाखाणीतून कोळसा भरल्यानंतर ते साई वर्धा पॉवर प्रा.लि. येथे कोळसा खाली करण्याकरिता गेले असता हा अपघात घडला. वेकोलिच्या नायगाव कोळसाखाणीतून साई वर्धा पॉवर प्लांट या वीज निर्मिती प्रकल्पाला कोळसा वाहतूक करण्याचे कंत्राट पंजाब ट्रान्सपोर्ट कंपनीला मिळाले आहे. या कंपनीचे अनेक ट्रक वर्धा पॉवर प्लांट येथे कोळशाची वाहतूक करतात. याच कंपनीतील कोळसा वाहतुकीच्या ट्रकवर मागील अनेक वर्षांपासून चालक म्हणून कार्यरत असलेले हरिदास साठे हे आपले कर्तव्य बजावत असतांना ट्रकवरून पडून मृत्युमुखी पडले. वर्धा पॉवर येथे नेहमी ते ट्रक खाली करण्याकरिता जायचे. मात्र आज दबा धरून बसलेल्या मृत्यूने डाव साधला व काळाने त्यांना कायमचे हिरावून घेतले. कोळसा भरलेला ट्रक (MH ० ४ NY ९७३७) वर्धा पॉवर प्लांट येथे घेऊन गेल्यानंतर हरिदास साठे हे ट्रकवर चढून ताडपत्री सोडत असतांना ताडपत्रीचा दोर तुटल्याने तोल जाऊन ते खाली पडले. यात त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांना वरोरा उपजिल्हा रुग्णालयात हलवितांना त्यांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती वरोरा पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेहाचे शवविच्छेदन करण्याची प्रक्रिया पूर्ण केली. घटनेचा पुढील तपास वरोरा पोलिस करीत आहे.
हरिदास साठे यांचे कंपनीतील सर्वांशीच सलोख्याचे संबंध होते. ट्रक चालविण्याचा त्यांना दीर्घ अनुभव असल्याने कंपनीत ते अनुभवी चालक म्हणून ओळखले जायचे. मनमिळाऊ स्वभावामुळे ते सर्वांनाच आपलेसे वाटायचे. सुस्वभावी व्यक्तिमत्व असलेले हरिदास साठे हे सामाजिक उपक्रमातही पुढाकार घायचे. सर्वांच्या सुखदुःखात त्यांचा सहभाग असायचा. कुटुंबातील करते व कमावते व्यक्ती ते एकमेव असल्याने कुटुंबाची पूर्ण जबाबदारी त्यांच्यावरच होती. त्यांच्या पश्च्यात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा आप्त परिवार आहे. मुलगी १५ ते १६ वर्षाची असून मुलगा १८ ते १९ वर्षाचा आहे. दोन्ही मुलं शिक्षण घेत आहेत. घरातील कर्त्या पुरुषाचा असा हा अपघाती मृत्यू झाल्याने कुटुंबाचा आधार हिरावला गेला आहे. हरिदास यांच्या जाण्याने कुटुंबं पोरकं झालं आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक व मानसिक आधार मिळावा अशी अपेक्षा कंपनीतील अन्य कर्मचाऱ्यांकडून व्यक्त होतांना दिसत आहे.
Comments
Post a Comment