कारच्या डिक्कीतून धारदार तलवार जप्त
प्रशांत चंदनखेडे वणी
एका कारमधून पोलिसांनी धारदार तलवार जप्त केली. ही कार्यवाही २८ डिसेंबरला रात्री ११.३९ वाजताच्या सुमारास शहरातील महाराष्ट्र बँक जवळ करण्यात आली. पोलिसांनी धारदार तलवारीसह कार ताब्यात घेतली आहे. तसेच आरोपी प्रणय विजय जाधव (२७) रा. अण्णाभाऊ साठे चौक याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
शहरात गस्त घालणाऱ्या पोलिसांना महाराष्ट्र बँकच्या मागे उभ्या असलेल्या कार मधील युवक धारदार शस्त्र जवळ बाळगून असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहिती वरून पोलिसांनी महाराष्ट्र बँक जवळ येऊन कारचा शोध घेतला असता त्यांना बँकेच्या मागील बाजूला एक कार उभी दिसली. या कारची तपासणी केल्यानंतर पोलिसांना कारच्या डिक्कीमध्ये धारदार तलवार आढळून आली. पोलिसांनी ७७ सेमी लांब व ४ सेमी रुंद असलेली धारदार तलवार व मारुती ८०० (MH ३१ CN ४८१२) कार ताब्यात घेऊन आरोपी प्रणय जाधव याच्यावर अवैधरित्या शस्त्र बाळगल्या प्रकरणी भारतीय शस्त्र अधिनियम ४/२५ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
ही कार्यवाही ठाणेदार अनिल बेहेरानी यांच्या मार्गदर्शनात पीएसआय सुदामा आसोरे, जमादार विकास धडसे, पोकॉ. सागर सिडाम, शुभम सोनुले यांनी केली.
Comments
Post a Comment