शहरातील जयस्वाल पीयूसी सेंटरचा परवाना रद्द करण्याची मागणी
प्रशांत चंदनखेडे वणी
पीयूसी काढणाऱ्या वाहन धारकांकडून नियमबाह्य पद्धतीने पीयूसी शुल्क उकळण्याचा प्रकार शहरातील जयस्वाल पीयूसी सेंटरमध्ये सर्रास सुरु असून पीयूसी काढणाऱ्या वाहनधारकांची येथे लूट केली जात आहे. अधिकृत पीयूसी सेंटर मधून पीयूसी प्रमाणपत्र देतांना जास्तीची रक्कम वसूल करून वाहनधारकांची लूट करणाऱ्या जयस्वाल पीयूसी सेंटरचा परवाना रद्द करण्याची मागणी वजा तक्रार सामाजिक कार्यकर्ते रविंद्र कांबळे यांनी अप्पर परिवहन आयुक्त मुंबई व उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी यवतमाळ यांच्याकडे केली आहे.
वाहनधारकांना नियमानुसार वाहनांची पीयूसी (पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट) काढणे बंधनकारक आहे. वाहनांच्या इतर कागदपत्रांप्रमाणेच पीयूसी हे देखील एक महत्वाचे प्रमाणपत्र आहे. त्यामुळे वाहनधारक वाहनांची पीयूसी काढण्याची तसदी घेतात. शहरात जयस्वाल पीयूसी सेंटर आहे. येथून मोठ्या प्रमाणात वाहनधारक वाहनांची पीयूसी काढतात. मात्र या पीयूसी सेंटरमध्ये वाहनधारकांची लूट होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. पीयूसी प्रमाणपत्रावर १२५ रुपये एवढी रक्कम लिहिलेली असतांना पीयूसी सेंटरचा संचालक वाहनधारकांकडून २०० रुपये घेत असल्याचे वास्तव पुढे आले आहे. रविंद्र कांबळे यांची स्वतःची रुग्णवाहिका असून ७ डिसेंबरला या रुग्णवाहिकेची (MH २९ T ३९१८) पीयूसी काढण्याकरिता ते शहरातील जयस्वाल पीयूसी सेंटर येथे गेले. तेथे वाहनाचे पीयूसी प्रमाणपत्र देतांना त्यांच्याकडून २०० रुपये पीयूसी शुल्क घेण्यात आले. मात्र पीयूसी प्रमाणपत्रावर १२५ रुपये एवढीच रक्कम लिहिलेली होती. पीयूसी सेंटरच्या संचालकाला पीयूसी शुल्क भरल्याची पावती मागितली असता त्यांनी ती देण्यास नकार दिला. पीयूसी शुल्कावर शासनाची १८ टक्के जीएसटी लागते. परंतु जयस्वाल पीयूसी सेंटरवर पीयूसी शुल्क भरल्याची पावती देण्यात येत नसल्याने या सेंटरचा संचालक जीएसटी भरत नसल्याचा दाट संशय व्यक्त करण्यात येत आहे.
जयस्वाल पीयूसी सेंटर सुरु झाले तेंव्हापासून संचालकाने पीयूसी शुल्क भरल्याची वाहधनरकांना पावती दिली नसावी ही शक्यता वर्तविण्यात येत आहे. पीयूसी प्रमाणपत्रावर १२५ रुपये रक्कम लिहिलेली असतांना वाहधारकांकडून २०० रुपये पीयूसी शुल्क घेण्याचा हा प्रकार नेमका काय आहे, याची चौकशी होणे गरजेचे झाले आहे. तसेच पीयूसी प्रमाणपत्रावर जीएसटी नंबर का टाकण्यात आला नाही, याची देखील चौकशी करून यात संचालक दोषी आढळल्यास तात्काळ जयस्वाल पीयूसी सेंटरचा परवाना रद्द करण्याची मागणी वजा तक्रार सामाजिक कार्यकर्ते रविंद्र कांबळे यांनी अप्पर परिवहन आयुक्त मुंबई व उप-प्रादेशिक अधिकारी यवतमाळ यांच्याकडे केली आहे.
Comments
Post a Comment