कापूस चोरट्यांच्या शिरपूर पोलिसांनी अवघ्या २४ तासांत आवळल्या मुसक्या
प्रशांत चंदनखेडे वणी
शेतात वेचून ठेवलेला कापूस चोरी करणाऱ्या चोरट्यांचा अवघ्या २४ तासांत शोध लावून शिरपूर पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. २८ डिसेंबरला शेतातून कापूस चोरी झाल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर ठाणेदार माधव शिंदे यांनी शीघ्र तपासचक्रे फिरवून या चोरी प्रकरणाचा छडा लावला. कापूस चोरी करणाऱ्या तीनही चोरट्यांना शिरपूर पोलिसांनी अवघ्या २४ तासांत अटक केली. आसिफ शेख इब्राहिम शेख (३२), वैभव मारोती मडकाम (२४), शिवाजी उर्फ विठ्ठल मरसकोल्हे (३२) सर्व रा. कुरई ता. वणी अशी या पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
शिरपूर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कुरई येथील गिरीधर सिताराम मोहितकार या कास्तकाराने शेतात वेचून ठेवलेला कापूस अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची तक्रार पोलिस स्टेशनला नोंदविली. त्यांच्या तक्रारी वरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला. कापूस चोरीला गेल्याची तक्रार प्राप्त होताच ठाणेदार माधव शिंदे यांनी कौशल्यपूर्ण पद्धतीने तपास करून अवघ्या २४ तासांत चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या. शेतात सध्या कापूस वेचणीचा हंगाम सुरु आहे. कुरई येथील शेतकऱ्यानेही शेतमजूर लावून आपल्या शेतातील कापसाची वेचणी केली. मात्र कापूस वेचणी करतांना सायंकाळ झाल्याने त्यांना कापूस घरी नेण्याकरिता बैलगाडी मिळाली नाही. त्यामुळे कापसाचे गाठोडे त्यांनी शेतातच ठेवले. २६ डिसेंबरला कापूस वेचणी करून शेतकरी घरी गेल्यानंतर चोरट्यांनी चोरीचा डाव साधला. शेतात ठेऊन असलेला २ क्विंटल कापूस (किंमत १५ ८०० रुपये ) चोरट्यांनी लंपास केला. शेतकरी २७ डिसेंबरला सकाळी जेंव्हा शेतात गेला तेंव्हा त्याला शेतात कापसाचे गाठोडे आढळून आले नाही. त्याने आजूबाजूला शोध घेतल्यानंतर २८ डिसेंबरला कापूस चोरी गेल्याची तक्रार पोलिस स्टेशनला नोंदविली.
ठाणेदार माधव शिंदे यांनी अवघ्या २४ तासांत या चोरी प्रकरणाचा छडा लावून कुरई येथीलच तीनही चोरट्यांना बेड्या ठोकल्या. त्यांच्या जवळून पोलिसांनी कापसाचे तीन गाठोडे वजन २ क्विंटल किंमत १५ हजार ८०० रुपये, गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल किंमत ६० हजार रुपये असा एकूण ७५ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सदर कार्यवाही जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलिस अधीक्षक पियुष जगताप, एसडीपीओ गणेश किंद्रे, स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळचे पोलिस ज्ञानोबा देवकते यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार माधव शिंदे, पोउपनि रावसाहेब बुधवंत, पोहवा गंगाधर घोडाम, पोकॉ. विनोद काकडे यांनी केली.
Comments
Post a Comment