मोटारसायकल चोरीत माहीर असलेल्या चोरट्याच्या एलसीबी पथकाने आवळल्या मुसक्या, तब्बल १९ दुचाक्या केल्या जप्त

प्रशांत चंदनखेडे वणी 

गुन्हेगारांना शोधून काढण्यात महत्वाची भूमिका बजाविणाऱ्या यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखा पथकाने एका दुचाकी चोरट्याचा वेध घेऊन त्याच्या जवळून चोरीच्या तब्बल १९ दुचाक्या जप्त केल्या आहेत. ही धडक कार्यवाही २९ डिसेंबरला पिंपळखुटी परिसरात करण्यात आली. या कार्यवाहीत एलसीबी पथकाने ८ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांनी मालमत्तेशी संबंधित गुन्हे करणाऱ्यांवर कार्यवाही करण्याचे आदेश दिल्याने स्थानिक गुन्हे शाखा पथकाचे पोलिस निरीक्षक ज्ञानोबा देवकते यांच्या नेतृत्वात एलसीबी पथक गुन्हेगारांचा शोध घेत होतं. दरम्यान पिंपळखुटी परिसरात गस्त घालत असतांना पथकाला एक दुचाकी चालक संशयास्पदरित्या दुचाकी घेऊन जातांना दिसला. पथकाने त्याला थांबवून त्याची चौकशी केली असता तो आदिलाबाद येथील रहिवाशी असल्याचे त्याने सांगितले. पथकाने त्याला त्याचे नाव विचारले असता त्याने रेहमतुल्ला मुजीब चाऊस असे सांगितले. मात्र दुचाकीचा क्रमांक (TS १८ E १८२४) हा निर्मल जिल्हातील असल्याने एलसीबी पथकाला त्याच्यावर संशय आला. त्यामुळे पथकाने त्याची आणखी कसून चौकशी केली. नंतर त्याने आपली खरी ओळख पोलिसांना सांगितली. तो दुचाकी चोरटा असल्याचे पोलिस चौकशीत निष्पन्न झाले. त्याने सदर दुचाकी ही मुकुटबन परिसरातून चोरी केल्याची एलसीबी पथकासमोर कबुली दिली. एवढेच नाही तर त्याने वेगवेगळ्या ठिकाणांवरून तब्बल १८ मोटारसायकल चोरी केल्याचे पथकाला सांगितले. यावरून पथकाने त्याने चोरी केलेल्या मोटारसायकलची खात्री करून त्याच्या जवळून चोरीच्या एकूण १९ मोटारसायकल जप्त केल्या आहेत. त्याने या मोटारसायकल यवतमाळ, चंद्रपूर, आदिलाबाद व निर्मल येथून चोरी केल्याचे चौकशीत पुढे आले आहे. या कार्यवाहीत एलसीबी पथकाने ८ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपी रेहमतुल्ला मुजीब चाऊस याच्यावर चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी हा दुचाकी चोरट्यांच्या टोळीतील सदस्य तर नसावा, या दिशेनेही एलसीबी पथकाकडून तपास करण्यात येत आहे. 

सदर कार्यवाही जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलिस अधीक्षक पियुष जगताप यांच्या मार्गदर्शनात स्थनिक गुन्हे शाखा पोनि. ज्ञानोबा देवकते यांच्या नेतृत्वात सपोनि अजयकुमार वाढवे, पोहवा उल्हास कुरकुटे, सुनिल खंडागळे, सुधिर पांडे, पोना सुधिर पिदूरकर, पोशि. रजनीकांत मडावी, चालक पोहवा नरेश राऊत यांनी केली.   

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी