अस्ताला जाणाऱ्या सूर्याकडून लागली सोनेरी किरणांची आस, येणारं नवीन वर्ष असेल सर्वांसाठीच खास
प्रशांत चंदनखेडे वणी
कटू गोड आठवणी देऊन २०२४ हे वर्ष आता संपण्यावर आलं आहे. लवकरच २०२५ ची रम्य पहाट उजळणार आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी संपूर्ण सृष्टी सजली आहे. मावळत्या वर्षात सोबतीला असलेली मंडळी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी एकवटली आहे. अस्ताला जाणाऱ्या सूर्याकडून नवीन सोनेरी किरणांची आस लागली आहे. २०२५ हे वर्ष सुखाची पहाट घेऊन उजळेल या अपेक्षेने मानवी मन व्याकुळलं आहे. वर्षामागून वर्ष येतात आणि जातात. मात्र नवीन वर्षात नवीन काही तरी घडेल हा आशावाद नेहमी मानवी मनाला नवी उमेद देतो. आयुष्यात बदल होईल, काही तरी नवीन घडेल ही नवीन वर्षाकडून प्रत्येकाला आस लागलेली असते. दुःख निराशेचा काळोख सरेल आणि सुख, आनंद जीवनात दरवळेल ही आशा मानवी जीवनाला धैर्य देते. नवीन वर्षात नवीन संकल्पना जाग्या होतात. सूर्य तोच असतो पण त्याचे सोनेरी किरण मानवी मनात नवचैतन्य जागवितात. नवा ध्यास, नवा विश्वास नवीन वर्षातला नवा प्रवास, नवीन इच्छा, नव्या आकांक्षा, नवीन स्वप्न उराशी बाळगून सुरु होतो जीवनाचा एक नवा अध्याय. प्रश्न तेच, व्याख्या त्याच, उदाहरणं तीच आणि नियमावलीही तीच पण दृष्टिकोन मात्र बदलतो. परिस्थितीला सामोरे जाण्याची ऊर्जा मिळते. आव्हाने पेलण्याचं बळ मिळतं. कारण वर्ष बदलेलं असतं. नवीन वर्षात आयुष्यात काही तरी बदल घडेल ही विश्वासाहर्ता मानवी जीवनाची प्रेरणा बनते. आणि त्यातूनच जीवनाचा मार्ग बदलतो. नवीन वर्षात आयुष्य बदलेल या जिद्दीने आणि परिश्रमाने धैय्य गाठण्याचा झालेला प्रयत्नच मानवी जीवन सुखी व आनंदी करतो. आणि त्याला लाभते ती नवीन वर्षाची किनार. त्यामुळे नवीन वर्षात नवीन धैय्य गाठण्याचा प्रयत्न करूया आणि झालं गेलं विसरून नव्या उम्मेदीने जीवन जगूया.
जीवनाविषयी सकारात्मक दृष्टिकोन बाळगणाऱ्या सर्व मानवजातीला लोकसंदेश न्यूज परिवाराकडून नवीन वर्षाच्या (२०२५) आभाळभर शुभेच्छा !
"हर खुशी, खुशी मांगे आपसे, जिंदगी, जिंदगी मांगे आपसे, उजाले इतने हो मुकद्दरमे आपके, की चांद भी रोशनी मांगे आपसे !"
Comments
Post a Comment