Latest News

Latest News
Loading...

कार व दुचाकीची समोरासमोर धडक, अपघातात दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू

प्रशांत चंदनखेडे वणी 

कार व दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना २ डिसेंबरला रात्री ११ ते ११.३० वाजताच्या सुमारास वणी नांदेपेरा मार्गावरील प्रसाद हॉटेल जवळ घडली. नांदेपेरा चौफुली वरून वणीकडे वळण घेणाऱ्या कारची व वणी वरून वांजरीकडे जाणाऱ्या दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात वांजरी या आपल्या गावी परतणाऱ्या दुचाकीस्वार तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. आनंद विजय नक्षिणे (२६) रा. वांजरी असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी अपघातग्रस्त कार व दुचाकी ताब्यात घेतली आहे. 

तालुक्यातील वांजरी येथे वास्तव्यास असलेला हा तरुण शहरातील देशमुखवाडी येथे राहणाऱ्या आपल्या आत्याकडे आला होता. रात्री ११ वाजताच्या सुमारास तो वांजरी येथे परतत असतांना नांदेपेरा चौफुली वळण रस्त्यावर कार व दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली. दुचाकी कारला धडकल्याने दुचाकीस्वार हा रोडवर पडला. यात त्याच्या डोक्याला जबर मार लागला. अपघातस्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी त्याला तात्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र तोपर्यंत बराच उशीर झाला होता. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. कार (MH २९ BC ५४५५) ही वणीकडे वळण घेत असतांना वणी वरून वांजरीकडे जाणाऱ्या दुचाकी (MH ३४ BW ९५११) व कारची समोरासमोर धडक झाली. या अपघातात आई वडिलांचा एकुलता एक मुलगा असलेला आनंद हा मृत्युमुखी पडला. आनंद हा शेती वाहत होता. तर त्याच्या वडिलांचा वांजरी येथे सलूनचा व्यवसाय असल्याचे समजते. याबाबत आनंदचे वडील विजय रामदास नक्षिणे (४७) रा. वांजरी यांनी पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविली आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस करीत आहे. 

No comments:

Powered by Blogger.