प्रशांत चंदनखेडे वणी
नगर पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे मागील अनेक वर्षांपासून बंद असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. येथील सामाजिक चळवळीचे पुरस्कर्ते असलेल्या वैचारिक विचारसरणीच्या सुज्ञ लोकांनी एकत्र येत हे वाचनालय सुरु करण्याचा मुद्दा उचलून धरला. तशी त्यांनी चार वर्षांपासून मागणीही लावून धरली होती. या मागणीचा त्यांनी सतत पाठपुरावाही केला. परंतु नगर पालिका प्रशासनाने त्यांच्या मागणीची दखल न घेतल्याने सामाजिक चळवळीच्या या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत नगर पालिका प्रशासनाला अल्टिमेटम दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय सुरु करण्याबाबतचे निवेदन देत ६ डिसेंबर पासून उपोषणाला बसण्याचा इशारा दिल्याने नगर पालिका प्रशासन घडबडून जागं झालं. आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय सुरु करण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ केला. आता लवकरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय वाचकांसाठी खुलं होणार आहे.
लोकनेते संजय देरकर हे आमदार झाल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये उत्साह संचारला आहे. सर्वसामान्य कार्यकर्तेही लोकांच्या मागण्यांना घेऊन आवाज उठवू लागले आहेत. सामाजिक क्षेत्रातूनही लोकहिताच्या मागण्या पुढे येऊ लागल्या आहेत. रसातळाला गेलेले मुद्देही आता नव्याने उपस्थित केले जात आहेत. दुर्लक्षित मागण्याही प्रशासनापुढे मांडल्या जात आहेत. सर्वसामान्यांच्या समस्या व प्रश्नही प्रखरतेने उपस्थित केले जात आहे. शिक्षणाला वाघिणीचं दूध संबोधणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे बहुजनांना शिक्षणाचं महत्व पटवून गेले. "वाचाल तर वाचाल" हा उपदेश त्यांनी बहुजनांना दिला. त्यामुळे युवा पिढीसह जेष्ठांनाही वाचनाची सवय लागावी याकरिता त्यांच्यासाठी वाचनालयासारखी माध्यमं उपलब्ध करून देणं गरजेचं असतांना ही माध्यमं बंद पाडली जात आहे. मात्र काही वैचारिक दृष्टिकोन जोपासणारी सुज्ञ मंडळी ही माध्यमं खुली करण्याकरिता सतत धडपडत असतात. अशाच शहरातील काही बुद्धिजीवी लोकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय सुरु करण्याचा मुद्दा तेवत ठेवला. आता त्यांच्या मागणीला यश आले आहे. नगर पालिका प्रशासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय सुरु करण्याचा मार्ग मोकळा केला आहे. हे वाचनालय सुरु करण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ देखील केला आहे. आता लवकरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय वाचकांसाठी खुलं होणार आहे. २६ नोव्हेंबरला वणी विकास समितीचे रविंद्र उर्फ बबलू मेश्राम यांच्यासह प्रविण खानझोडे, रविंद्र कांबळे, किशोर मुन, पी.के. टोंगे, महेश टिपले, गजानन आत्राम, शेख अहमद अल कमल यांनी नगर पालिका प्रशासनाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय सुरु करण्याबाबत दिलेल्या निवेदनातून ६ डिसेंबर पासून आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला होता, हे या ठिकाणी विशेष.
No comments: