प्रशांत चंदनखेडे वणी
बँकेशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर फोन करून सायबर चोरट्यांनी एका शिक्षकेत्तर कर्मचाऱ्याच्या बँक खात्यातून तब्बल ५ लाख रुपये उडविल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. जनता विद्यालयात वरिष्ठ लिपिक असलेले प्रमोद पुंडलिक राजूरकर (५३) हे शहरातील विठ्ठलवाडी येथील रहिवाशी आहेत. त्यांचे सेंट्रल बँक ऑफ इंडिया व युनियन बँक ऑफ इंडिया या दोन बँकेत खाते आहे. त्यांच्या बँक खात्याला जिओ कंपनीचा मोबाईल नंबर व आधार कार्ड लिंक आहे. बँक खात्याशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर त्यांना एका अनोळखी नंबर वरून फोन आला. त्यानंतर त्यांचे अचानक सिम बंद झाले. सिम बंद झाल्याने त्यांनी आलेल्या मोबाईल क्रमांकावर फोन केला असता त्यांना तुमचे सिम निलंबित करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे त्यांनी शहरातील जिओ सर्व्हिस सेंटर येथे जाऊन सिम बंद झाल्याची तक्रार केली. तेथील कर्मचाऱ्यांनी त्यांचा १० मिनिट मोबाईल हाताळला व त्यांना ओटीपी विचारला. त्यांनी ओटीपी सांगितल्यानंतर सिम सुरु झाले. मात्र २ तासांतच परत सिम बंद झाले. परत त्यांनी सर्व्हिस सेंटरला भेट दिली. तेथील कर्मचाऱ्यांनी तीच प्रक्रिया पुन्हा केली. आणि सिम सुरु झाले. परंतु १९ नोव्हेंबरला आणखी सिम बंद झाल्याने ते परत एकदा जिओ सर्व्हिस सेंटर येथे गेले असता तेथील कर्मचाऱ्यांनी त्यांचे सिम पूर्णपणे बंद झाल्याचे सांगून त्यांना नवीन सिम घेण्यास सांगितले. सिम कार्ड बंद चालू होण्याच्या या कालावधीत त्यांच्या दोनही बँक खात्यातून तब्बल ४१ वेळा ऑनलाईन ट्रांझॅक्शन होऊन ५ लाख ९ हजार ९९८ रुपयांची रक्कम उडविण्यात आली. याबाबत त्यांनी आधी यवतमाळ सायबर सेल येथे तर नंतर वणी पोलिस स्टेशनला तक्रार नोंदविली आहे.
जनता विद्यालयात सिनियर क्लर्क असलेले प्रमोद राजूरकर यांचं विठ्ठलवाडी येथे वास्तव्य आहे. १५ नोव्हेंबरला त्यांच्या मोबाईलवर एका अनोळखी नंबर वरून फोन आला. त्यांच्याशी फोनवर संवाद साधणाऱ्या व्यक्तीने १ किंवा २ नंबर डायल करा अशा सूचना केल्या. मात्र प्रमोद राजूरकर यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. नंतर काही वेळातच त्यांचे सिम कार्ड बंद पडले. त्यामुळे त्यांनी आलेल्या नंबरवर फोन केला असता त्यांना तुमचे सिम निलंबित करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर त्यांनी शहरातील जिओ सर्व्हिस सेंटर येथे जाऊन सिम बंद झाल्याबाबत तक्रार केली. तेथील कर्मचाऱ्यांनी त्यांचा १० मिनिट मोबाईल हाताळून त्यांना आलेला ओटीपी विचारला. नंतर काही वेळात सिम सुरु झाले. मात्र २ तासांनी परत सिम बंद झाले. परत ते सर्व्हिस सेंटरला गेले. येथील कर्मचाऱ्यांनी परत तीच प्रक्रिया केली. ओटीपी विचारला आणि काही वेळात पुन्हा सिम सुरु झाले. १९ नोव्हेंबरला प्रमोद राजूरकर यांची निवडणूक ड्युटी लागली. त्या दिवशी त्यांचे परत सिम बंद पडले. निवडणूक ड्युटी आटोपल्यानंतर २१ नोव्हेंबरला त्यांनी आणखी जिओ सेंटरला भेट दिली. तेंव्हा त्यांना सिम कार्ड पूर्णपणे बंद झाल्याचे सांगण्यात आले. तसेच त्यांना नवीन सिम घेण्याबाबत सुचविण्यात आले. त्यामुळे त्यांनी तात्पुरते नवीन सिम कार्ड घेतले. मात्र त्यांना जुनाच नंबर हवा असल्याने तेथील कर्मचाऱ्यांनी त्यांना मारेगाव सर्व्हिस सेंटर येथे जाण्यास सांगितले. मारेगाव सर्व्हिस सेंटरला गेल्यानंतर त्यांना त्यांचा जुना नंबर मिळाला. जुना नंबर सुरु होताच त्यांच्या मोबाईलवर बँक खात्यातून ५० हजार रुपये विड्रॉल झाल्याचा मॅसेज आला. बँक खात्यातून परस्पर व्यवहार झाल्याने त्यांना चांगलाच धक्का बसला. त्यामुळे त्यांनी लगेच बँकेत धाव घेतली.
त्यांनी सेंट्रल बँकेत जाऊन चौकशी केली असता त्याच्या बँक खात्यातून तब्बल २८ वेळा ऑनलाईन व्यवहार झाले असल्याचे बँक कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले. सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या वणी शाखेतून तब्बल ३ लाख ९३ हजार रुपये युपीआय (UPI) द्वारे त्यांच्या बँक खात्यातून विड्रॉल करण्यात आले असल्याचे बँक कर्मचाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे त्यांना आपली ऑनलाईन फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी युनियन बँकेचे खाते तपासले असता त्यातूनही १३ वेळा ऑनलाईन ट्रांझॅक्शन होऊन युपीआय द्वारे १ लाख १६ हजार ९९८ रुपये विड्रॉल करण्यात आल्याचे तेथील कर्मचाऱ्यांनी देखील त्यांना सांगितले. मोबाईल नंबर बंद चालू होण्याच्या या कालावधीत प्रमोद राजूरकर यांच्या दोन्ही बँक खात्यातून ४१ वेळा ऑनलाईन ट्रांझॅक्शन होऊन सायबर चोरट्यांनी तब्बल ५ लाख ९ हजार ९९८ रुपये उडविले. याबाबत त्यांनी यवतमाळ सायबर सेल येथे २८ नोव्हेंबर व २ डिसेंबरला तक्रार नोंदविली आहे. तसेच ४ डिसेंबरला वणी पोलिस स्टेशन येथेही तक्रार नोंदविली असून पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध बीएनएसच्या कलम ३१८(४), ६६(ड) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार अनिल बेहेरानी यांच्या मार्गदर्शनात पोलिस करीत आहे.
No comments: