Latest News

Latest News
Loading...

तालुक्यात अवैध धंदे फोफावले, यावर आमदार लावतील काय प्रतिबंध, जनतेतून व्यक्त होत आहेत अपेक्षा

प्रशांत चंदनखेडे वणी 

तालुक्यात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात फोफावले आहेत. मटका, झंडीमुंडी, कोंबड बाजार राजरोसपणे सुरु आहेत. कोळसा व वाळूची चोरीही मोठ्या प्रमाणात होतांना दिसत आहे. अनैतिक धंदे दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. देह विक्रीचंही जाळं आणखी पसरू लागलं आहे. गावागावात अवैध दारू विक्रीला उधाण आलं आहे. तालुक्यात अवैध धंद्यांना चालना मिळू लागल्याने गुन्हेगारी प्रवृत्तीही वाढू लागली आहे. रेती व कोळसा तस्करांनी तालुक्यात आपले बस्तान मांडले आहेत. गुंड प्रवृत्तीचे लोक तालुक्यात ठाण मांडून बसले आहेत. त्यामुळे अवैध धंद्यांना आळा घालणे गरजेचे झाले आहे. पोलिस केवळ थातुर मातुर कारवाया करून आपलं टार्गेट पूर्ण करतात. त्यामुळे वणी विधानसभा मतदार संघाची धुरा ज्यांच्यावर सोपविण्यात आली ते तालुक्यातील अवैध धंद्यांना लगाम लावतील काय, अशी अपेक्षा जनता  बाळगून आहे. नवनिर्वाचित आमदारांकडून जनतेला मोठ्या अपेक्षा आहेत. 

तालुक्यात वाळू तस्करी प्रचंड वाढली आहे. वाळू तस्करही तालुक्यात मोठ्या प्रमाणात सक्रिय आहेत. महसूल विभागाच्या मूक संमतीनेच वाळू तस्करी फळफुलली आहे. महसूल विभागच दावणीला बांधला गेल्याने तस्करांना कार्यवाहीची भीतीच उरली नसल्याचे दिसून येत आहे. महसूल विभागाच्या आशीर्वादानेच वाळू तस्करीला उधाण आल्याची खुली चर्चा आता शहरातून ऐकायला मिळत आहे. महसूल विभागाचं पाठबळ मिळत असल्याने बिनधास्त वाळू तस्करी सुरु आहे. रेती घाटांवर तस्करांचे रात्रीचे खेळ चालतात. तालुक्यातील सर्वच रेती घाट तस्करांनी काबीज केल्याचे दिसून येत आहे. गुंड प्रवृत्तीचे लोक तस्करीच्या धंद्यात उतरले असल्याने रेती घाटांवर त्यांचीच दादागिरी पाहायला मिळते. रात्री रेती घाटांकडे हे वाळू माफिया कुणाला फिरकूही देत नाही. रेती घाटांकडे जाणाऱ्या रस्त्यांवर गुंड प्रवृत्तीचे युवक गस्त घालतांना दिसतात. वाळू माफियांनी शहरापासून तर घाटांकडे जाणाऱ्या रस्त्यांवर ठिकठिकाणी आपले फंटर तैनात केले आहेत. त्यामुळे दहशत निर्माण करून राजरोसपणे वाळू तस्करी केली जात आहे. शासनाचा लाखो रुपयांचा महसूल गिळंकृत करून तस्कर मालामाल होत आहे. तर प्रशासन केवळ मुकदर्शक बनून बघ्याची भूमिका घेत आहे. काळ्या बाजारात मनमर्जी किंमतीत रेती विकली जात आहे. सर्वसामान्य नागरिकाला काळया बाजारातील रेतीची किंमत परवडणारी नसल्याने तो मात्र हक्काचं घर बांधण्यापासून वंचित राहत आहे. त्यामुळे कायदेशीरपणे रेती घाट सुरु करून वाळू तस्करीला पायबंद लावण्याची अपेक्षा नवनिर्वाचित आमदारांकडून नागरिक बाळगून आहेत. 

वाळू तस्करांनी अक्षरशः रेती घाट पोखरून टाकले आहेत. मोठमोठ्या पोकल्यांड मशिनांनी अवैधरित्या वाळूचं उत्खनन केलं जात आहे. बेसुमार वाळूचा उपसा करून ती काळ्या बाजारात विकली जात आहे. रेतीची अवैध वाहतूक सुरु असतांना ती महसूल विभागाच्या डोळ्याने मात्र दिसत नाही. सर्रास रेती घाटांवरून रेतीची चोरी केली जात असतांना महसूल विभाग आंधळ्याचं सोंग घेऊन आहे. त्यातल्यात्यात आता कोळसाखदाणीतून कोळसा चोरी होत असल्याच्याही चर्चांना उधाण आले आहे. कोळसाखाणीतून कोळसा चोरी करणारे ट्रक चोरट्या बाजारात कोळसा खाली करत असल्याची चर्चा रंगू लागली आहे. त्यातच कोळशाच्या तीन ट्रकांवर कार्यवाही न करता त्यांना सोडून देण्यात आल्याचीही चर्चा वर्तुळात रंगली आहे. रात्री कोळशाची अवैध वाहतूक होत असल्याचे आता खुल्या आवाजात बोलले जात आहे. यात कोळसाखाणीतील अधिकारी कर्मचाऱ्यांपासून तर कार्यवाही न करणाऱ्या सर्वांचेच आत काळे झाले असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. त्यामुळे खनिजांच्या तस्करीला आवर घालणे गरजेचे झाले आहे. अन्यथा गुन्हेगारी कारवायांमध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी अवैध व्यावसायिकांनी आपले अड्डे थाटले आहेत. जगोजागी मटका अड्डे सुरु आहेत. झंडी मुंडी सुरु आहे. गाव शिवारात कोंबड बाजार भरवला जात आहे. गावागावात अवैध दारूचा महापूर वाहत आहे. अवैध व्यवसायांना पाठबळ कुणाचे हा प्रश्न आता निर्माण झाला आहे. पोलिस विभाग अवैध धंद्यांवर अंकुश लावण्यात अपयशी ठरताना दिसत आहे. पोलिस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावरच मटका अड्डे चालवले जात आहे. झेंडी मुंडीही खेळविली जात आहे. परंतु पोलिस मात्र एकमेकांवर कुरघोडी करण्यातच धन्यता मानत आहेत. राजूर, कायर, मुकुटबन, शिंदोला, घोन्सा, भालर, बेलोरा फाटा यासह अनेक गावांमध्ये अवैध धंदे जोरात सुरु आहेत. शहरात तर अवैध धंद्यांना अक्षरशः उधाण आलं आहे. परंतु पोलिस प्रशासन केवळ बघ्याची भूमीका घेत आहे. केवळ टार्गेट पूर्ण करण्यासाठी पोलिसांकडून थातुर मातुर कारवाया केल्या जात आहे. 

काही पोलिस कर्मचारी अनेक वर्षांपासून वणी, मुकुटबन व शिरपूर पोलिस स्टेशनला चिकटून बसले आहेत. येथून बदली झालेले पोलिस कर्मचारीही लागेबांधे करून परत येथेच बदली करून घेत आहेत. वणी उपविभागातील तिनही पोलिस स्टेशन हे मलाईचे असल्याने ती चाखण्याची सवय सर्वांनाच लागली आहे. एकाच पोलिस स्टेशनमध्ये अनेक वर्षांपासून असलेल्या व वणी उपविभागातच सोइ नुसार बदल्या करून घेणाऱ्या पोलिसांचे शहर व तालुक्यात दोस्ती याराने वाढले आहेत. त्यामुळे त्यांचे हितसंबंध त्याच्या कार्यवाहीच्या आड येऊ लागले आहेत. आणि म्हणूनच अवैध व्यावसायिकांवर पोलिसांचा वचक राहिल्याचे दिसत नाही. त्यामुळे तालुक्यात वाढत असलेले अवैध धंदे अपराधीक घडामोडी वाढविणारे ठरू लागल्याने त्यावर अंकुश लावण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे. तेंव्हा नवनिर्वाचित आमदार याकडे लक्ष देतील काय, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होतांना दिसत आहे. 

No comments:

Powered by Blogger.