महापरिनिर्वाण दिना निमित्त हजारो अनुयायांनी केले महामानवाला अभिवादन, शहरातून काढण्यात आला कँडल मार्च
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिना निमित्त शहरासह तालुक्यातील हजारो अनुयायांनी त्यांना मानवंदना देऊन अभिवादन केले. शहरात ठिकठिकाणी अभिवादन सोहळे घेण्यात आले. महामानवाला अभिवादन करण्याकरिता सकाळ पासूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे त्यांच्या पुतळ्याजवळ अनुयायांनी गर्दी केली होती. राजकीय, सामाजिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मानवंदना देत अभिवादन केले. वणी मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार संजय देरकर यांनी देखील शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हारार्पण करून त्यांना मानवंदना देत आदरांजली वाहिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त रात्री शहरातुन कँडल मार्च काढण्यात आला. शहरातील बहुतांश परिसरातील अनुयायी हातात मोमबत्ती घेऊन या कँडल मार्चमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सम्राट अशोक नगर बुद्ध विहारापासून कँडल मार्चला सुरुवात झाली. शहरातील प्रमुख मार्गाने अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने हा कँडल मार्च काढण्यात आला. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे हा कँडल मार्च पोहचल्यानंतर येथे महामानवाला सामूहिक मानवंदना देण्यात आली. प्रत्येक वार्डातील अनुयायांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हारार्पण व श्रद्धांजली वाहून बाबासाहेब अमर रहेच्या घोषणा दिल्या. त्यानंतर सामूहिक बुद्ध वंदनेने महापरिनिर्वाण दिनाच्या कार्यक्रमाची सांगता झाली.
रेल्वे स्टेशन परिसरातील पंचशील झेंड्याजवळही घेण्यात आला अभिवादन सोहळा
दरवर्षी प्रमाणे यावर्षीही डॉ. बाबासाहेब जयंती उत्सव समिती व मध्य रेल्वे कर्मचारी रेल्वे स्टेशन वणी यांच्या विद्यमाने पंचशील झेंड्याजवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला. महामानवाला अभिवादन करण्याकरिता परिसरातील नागरिकांनी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली. यावेळी तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलित करून त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देत त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले. सामूहिक बुद्धवंदना घेऊन त्यांना सामूहिकरीत्या आदरांजली वाहण्यात आली. यावेळी उपस्थित महिलांनी अभिवादन गीते सादर केली. तसेच सामाजिक कार्यकर्त्या रेखा पाझरे व प्रशांत चंदनखेडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बहुजनांच्या उद्धारासाठी केलेला संघर्ष व लोकशाही प्रधान देशासाठी दिलेलं योगदान यावर आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचं संचालन व आभार प्रदर्शन प्रशांत चंदनखेडे यांनी केलं. त्यानंतर सायंकाळी पंचशील झेंड्याजवळून कँडल मार्च काढण्यात आला. यात परिसरातील अनुयायी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते
कार्यक्रमाला बंडू लभाने, विनोद गजभिये, रेखा पाझारे, माया चंदनखेडे, ज्योती गरपाल, मंजुळाबाई पाटील, शोभा भगत, शशिकला बोरकर, ज्योती नगराळे, वैशाली नगराळे, कांता गजभिये, मिरा धवन, इंदू पळवेकर, सुरेखा गजभिये, साधना धवन, निकिता नगराळे, प्रज्ञा धवन यांच्यासह परिसरातील उपासक उपासिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता अविनाश बोरकर, राहुल चंदनखेडे, वैभव गजभिये, प्रशांत चंदनखेडे यांनी सहकार्य केले.
No comments: