Latest News

Latest News
Loading...

मुकुटबन येथे मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट, भटक्या कुत्र्यांच्या हौदोसाने नागरिक त्रस्त

प्रशांत चंदनखेडे वणी 

मुकुटबन परिसरात मोकाट व भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला असून मोकाट कुत्र्यांच्या हौदोसाने नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. कुत्र्यांबरोबरच डुकरांच्या संख्येतही प्रचंड वाढ झाली असून त्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे. मोकाट कुत्रे व डुकरांच्या उपद्व्यापामुळे हैराण झालेल्या ग्रामस्थांनी त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामपंचायतीला दिलेल्या निवेदनातून केली आहे. 

मुकुटबन येथे मोकाट कुत्रे व डुकरांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यांचा परिसरात वावर वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. भटके कुत्रे व डुकरांच्या उपद्रवांमुळेही नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. काही भटके कुत्रे पिसाळले असून त्यांच्या पासून ग्रामस्थांना धोका निर्माण झाला आहे. ही पिसाळलेली कुत्री रस्त्याने जाणे येणे करणाऱ्या नागरिकांवर चवताळून येत असल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पिसाळलेल्या कुत्र्यांमुळे शाळकरी विद्यार्थ्यांमध्येही धास्ती निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने याबाबतीत खबरदारी घेणे गरजेचे झाले आहे. डुकरांचीही संख्या प्रचंड वाढली असून त्यांच्या परिसरात मुक्त संचार करण्याने घानव्यवस्था निर्माण होऊन रोगराई पसरू लागली आहे. त्यामुळे कुत्रे व डुकरांच्या वाढत्या प्रजनन संख्येवर नियंत्रण आणणे अति गरजेचे झाले आहे. 

मुकुटबन परिसरात मोठ्या प्रमाणात नागरीकरण वाढत आहे. वाढत्या नागरिकीकरणाबरोबरच भटक्या कुत्र्यांचाही प्रश्न गंभीर बनला आहे. प्रमुख रस्त्यांवर व गल्लीबोळात या मोकाट कुत्र्यांची भटकंती सुरु असते. बाजारपेठेतही भटक्या कुत्रांचा मोठ्या प्रमाणात वावर दिसून येतो. चिकन व मटणाच्या दुकानांजवळ ही भटकी कुत्री रेंगाळतांना दिसतात. कचऱ्याच्या ढिगाऱ्यांजवळही मोकाट कुत्र्यांचं वास्तव्य दिसून येतं. कळपाने ही कुत्री परिसरात फिरतात. वाहनांच्या मागे धावणे, पादचाऱ्यांवर गुरगुरणे, अंगावर चवताळून येणे हा त्यांचा दिनक्रम झाला आहे. शाळेत जाणारे विद्यार्थी, रस्त्यावरून जाणारे नागरिक व दुचाकीस्वारांना लक्ष करण्याचा प्रयत्न या कुत्र्यांकडून केला जात आहे. रात्रभर जोरजोरात भुंकणे व दिवसा पादचाऱ्यांना त्रस्त करणे हा या कुत्र्यांचा नित्यक्रमच झाला आहे. भटक्या कुत्र्यांच्या हौदोसाने गावकरी चांगलेच वैतागले आहेत. त्यामुळे गावातील भटकी कुत्री व डुकरांचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी गाववासीयांनी ग्रामपंचायतीला दिलेल्या निवेदनातून केली आहे. निवेदन देतांना प्रियल पथाडे, कुणाल नागभीडकर, सचिन मुळे यांच्यासह गावकरी उपस्थित होते.  

No comments:

Powered by Blogger.