महिला गेली मुलाच्या घरी झोपायला, आणि चोरट्यांनी चोरीचा डाव साधला, ४ लाख ९० हजारांचा मुद्देमाल केला लंपास
प्रशांत चंदनखेडे वणी
शहरातील गुरुवर्य कॉलनी येथे घरफोडी करून चोरट्यांनी ८९ ग्राम सोने व रोख रक्कम असा एकूण ४ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी केल्याची घटना आज ७ डिसेंबरला सकाळी ७ वाजता उघडकीस आली. याबाबत पोलिस स्टेशनला देण्यात आलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
शहरातील चोरीच्या घटनांवर अंकुश लावण्यात पोलिसांना यश आल्याचे दिसत असतांनाच परत घरफोडी व चोरीच्या घटना वाढू लागल्या आहेत. शहरातील अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा भेदून चोरटे चोरीचा डाव साधू लागल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. चोरट्यांनी परत डोके वर काढल्याने त्यांच्या मुसक्या आवळण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. शहरातील दाट वस्ती असलेल्या गुरुवर्य कॉलनीत चोरट्यांनी चोरीचा डाव साधल्याने नागरिक काळजीत आले आहेत. गुरुवर्य कॉलनी येथे राहत असलेल्या कमल बाळकृष्ण भुसारी (८०) यांचे घर फोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने व रोख रक्कमेवर हात साफ केला. सेवानिवृत्त असलेली ही वयोवृद्ध महिला ६ डिसेंबरला रात्री घराशेजारी राहणाऱ्या आपल्या मुलाकडे झोपायला गेली होती. ही संधी साधून चोरट्यांनी बंद घराला टार्गेट केले. घरात शिरून चोरट्यांनी घरातील ८९ ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने किंमत ४ लाख ४५ हजार रुपये व रोख ४५ हजार रुपये असा एकूण ४ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. महिला सकाळी घरी परतल्यानंतर तिला घरातील दृश्य पाहून धक्काच बसला. घरी चोरी झाल्याचे महिलेच्या निदर्शनास येताच तिने तात्काळ पोलिस स्टेशन गाठून अज्ञात चोरट्यांविरुद्ध तक्रार नोंदविली. पोलिसांनी कमल भुसारी यांच्या तक्रारी वरून अज्ञात चोरट्यांवर बीएनएसच्या कलम ३३१(४०), ३०५ (A) नुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास एपीआय अश्विनी रायबोले करीत आहे.
No comments: