Latest News

Latest News
Loading...

संजय देरकर आमदार होताच वणीकर जनतेची मागणी मान्य, अनेक वर्षानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाची दारे खुलली

 
प्रशांत चंदनखेडे वणी 

मागील अनेक वर्षांपासून बंद असलेलं डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय शहरातील सुज्ञ नागरिकांच्या मागणीवरून नगर पालिकेने खुलं करून दिलं आहे. लोकनेते संजय देरकर हे आमदार होताच वाचनालयाचा रेंगाळलेला प्रश्न मार्गी लागल्याने जनतेतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाचे अनेक वर्षांपासून बंद असलेले दरवाजे ६ डिसेंबरला महामानवाच्या महापरिनिर्वाण दिनी खोलण्यात आले. ज्या महामानवाने मागासवर्गीयांसाठी शिक्षणाचे दरवाजे खोलले, त्यांच्याच अनुयायांनी आज आवाज उठवून वाचनालयाची दारे उघडली. पोटाला जशी भाकरीची गरज आहे, तशी मेंदूच्या विकासाकरिता शिक्षणाची गरज आहे. वाचनातूनच बुद्धीचा विकास होतो, ही महापुरुषाची शिकावण अंगीकारून बुद्धिजीवी युवकांनी एकत्र येत महापुरुषाच्या नावाने असलेलं हे वाचनालय दीर्घ लढा देऊन खुलं केलं. या वाचनालयातच अभिवादन कार्यक्रम घेऊन महामानवाला आदरांजली वाहण्यात आली. वाचनालयात आयोजित या अभिवादन कार्यक्रमाला सर्व सामान्यांच्या हक्काचे नेते व विद्यमान आमदार संजय देरकर यांनी प्रामुख्याने उपस्थिती दर्शविली. त्यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हारार्पण करून त्यांना मानवंदना देत अभिवादन केले. 
महामानवाच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त खास करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयातच आयोजित करण्यात आलेल्या अभिवादन सोहळ्याला हे वाचनालय सुरु करण्याकरिता सतत पाठपुरावा करणारे प्रविण खानझोडे यांच्यासह बबलू मेश्राम, रविंद्र कांबळे, किशोर मुन, पी. के. टोंगे, महेश टिपले, गजानन आत्राम, शेख मोहंमद अल कमल, अजय खोब्रागडे, सचिन टिपले, सुरज उपरे, दादाजी देठे हे उपस्थित होते. तसेच कार्यकर्ते व आंबेडकरी अनुयायी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. लवकरच हे वाचनालय वाचकांसाठी उपलब्ध होणार आहे. नगर पालिकेने वाचनालयाचा कृती आरखडा तयार केला असून लवकरच वाचनालयाच्या सुशोभीकरणाचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे नगर पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. अशी माहिती प्रविण खानझोडे यांच्याकडून देण्यात आली आहे. वाचनाची आवड व छंद जोपासणाऱ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय हे एक महत्वाचं माध्यम ठरणार आहे. संजय देरकर आमदार होताच सुज्ञ जनतेची अनेक वर्षांपासूनची ही मागणी मान्य झाली. त्यामुळे वणी मतदार संघात विकासाचं एक नवीन पर्व सुरु होणार असल्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. 

No comments:

Powered by Blogger.