प्रतिबंधित सुगंधित गुटख्याची होणारी वाहतूक एलसीबी पथकाने रोखली, १ कोटी साडे चौतीस लाखांचा मुद्देमाल केला जप्त
प्रशांत चंदनखेडे वणी
यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखा पथकाने पिंपळखुटी आरटीओ चेकपोस्ट येथे एका कंटेनर मधून प्रतिबंधित सुगंधित गुटखा व कंटेनर असा तब्बल १ कोटी ३४ लाख ५१ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही प्रतिबंधित गुटख्यावरील मोठी कार्यवाही मानली जात आहे. गुजरात पासिंग असलेलं हे कंटेनर पिंपळखुटी चेकपोस्ट येथे आल्यानंतर कंटेनर चालकाच्या हालचाली संशयास्पद दिसून आल्याने स्थानिक गुन्हे शाखा पथकाने कंटेनरची तपासणी केली. तेंव्हा त्यात कोट्यवधी रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आढळून आला. पथकाने कंटेनर चालकाला अटक करून कंटेनरसह प्रतिबंधित गुटखा ताब्यात घेतला आहे. ही धडक कार्यवाही १० डिसेंबरला करण्यात आली.
जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांनी दिल्याने स्थानिक गुन्हे शाखा पथक अवैध धंद्यांवर कार्यवाही करण्याकरिता पेट्रोलिंग करीत असतांना त्यांना पांढरकवडा रोडने प्रतिबंधित गुटख्याची अवैध विक्री करीता वाहतूक होत असल्याची विश्वसनीय माहिती मिळाली. या माहिती वरून स्थानिक गुन्हे शाखा पथक पिंपळखुटी आरटीओ चेकपोस्टवर मालवाहू वाहनांची तपासणी करीत असतांना एक कंटेनर त्याठिकाणी आले. कंटेनर चालक अगदीच घाबलेल्या अवस्थेत दिसून आला. त्याच्या हालचालीही संशयास्पद वाटू लागल्याने स्थानिक गुन्हे शाखा पथकाने चालकाला त्याचे नाव विचारले. त्याने आपले नाव अख्तरभाई अहमदमिया शेख (४७) रा. बहियेल ता. देहगम जि. गांधीनगर (गुजरात) असे सांगितले. पथकाने कंटेनरची तपासणी केली असता त्यात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा आढळून आला. कंटेनर मधून प्रतिबंधित सुगंधित गुटखा अवैध विक्री करीता नेण्यात येत असल्याचा संशय पोलिसांना आला. पोलिसांनी प्रतिबंधित गुटखा किंमत १ कोटी ९ लाख ५१ हजार ८०० रुपये व कंटेनर (GJ २७ TF ०५८२) किंमत २५ लाख रुपये असा एकूण १ कोटी ३४ लाख ५१ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच कंटेनर चालक अखरभाई अहमदमिया शेख याला अटक करून त्याच्यावर अन्न सुरक्षा मानके कायदा २००६, नियम व नियमने २०११ चे कलम २६ (३), सहवाचन कलम ३०(२)(ए) तसेच अन्न सुरक्षा व मानद कायद्याच्या कलम ५९ अंतर्गत तथा बीएनएसच्या कलम २२३, विषारी अन्न पदार्थाची वाहतूक व विक्री कलम २७४, २७५, १२३ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
ही कार्यवाही जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलिस अधीक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर वैंजने (पांढरकवडा उपविभाग) स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळचे पोलिस निरीक्षक ज्ञानोबा देवकते यांच्या मार्गदर्शनात एपीआय अजयकुमार वाढवे, पोहवा उल्हास कुरकुटे, सुनिल खंडागळे, सुधिर पांडे, एनपीसी सुधिर पिदूरकर, निलेश निमकर, पीसी रजनीकांत मडावी, डीएचसी नरेश राऊत एलसीबी पथक यवतमाळ यांनी केली.
No comments: