Latest News

Latest News
Loading...

कोळसा धूळ प्रदूषणापासून वनसंपदेचं संरक्षण करण्याची मागणी

प्रशांत चंदनखेडे वणी 

कोळशाच्या धुळीमुळे वनसंपदा नष्ट होण्याच्या मार्गावर आली आहे. कोळशाच्या धुळीमुळे प्रदूषणात प्रचंड वाढ झाल्याने मानवी जीवनाबरोबरच वनसंपत्तीही धोक्यात आली आहे. कोळशाच्या धुळीमुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणाने वन संपत्तीचा ऱ्हास होऊ लागल्याने वन संपत्तीचे संरक्षण करण्याकरिता ठोस पाऊले उचलण्याची मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदूरकर यांनी केली आहे. चारगाव चौकी-आबई ते शिंदोला, साखरा (को.) मार्गावरील वनसंपदा कोळसा धूळ प्रदूषणाने नष्ट होण्याचा मार्गावर आली आहे. याबाबत विजय पिदूरकर यांनी वन विभागाला निवेदन दिले असून वन संपत्तीचे संरक्षण करण्याची मागणी केली आहे. 

साखरा (को.)-शिंदोला प्रमुख जिल्हा मार्ग व शिंदोला, आबई ते शिरपूर-चारगाव चौकी या मार्गावरून वेकोलिची मोठ्या प्रमाणात कोळसा वाहतूक सुरु असते. कोळशाची वाहतूक करतांना वेकोलि कडून कुठल्याही प्रकारचे नियम पाळले जात नाही. नियमांचं सर्रास उल्लंघन करून कोळशाची वाहतूक केली जात आहे. कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रकांवर व्यवस्थित ताडपत्री झाकली जात नसल्याने या ट्रकांमधून कोळशाची धूळ उडतांना दिसते. त्याचबरोबर ट्रकांवर व्यवस्थित ताडपत्री न बांधल्या गेल्याने ट्रकांमधून मोठ्या प्रमाणात कोळसा रस्त्यावर पडतो. नंतर याच कोळशाची भुकटी बनून तिचं धुळीत रूपांतर होते. आणि रस्त्यांवरून धावणाऱ्या वाहनांमुळे ती सतत उडत असते. कोळसा वाहतुकीची शेकडो वाहने दिवसरात्र कोळशाची वाहतूक करीत असल्याने या मार्गावर नेहमी काळं धुकं पसरलेलं दिसतं. ही धुळ झाडे वेलींवर साचून राहत असल्याने झाडं पार काळवंडली गेली आहेत. झाडांच्या पानांवर धुळीचे कण चिकटून राहत असल्याने प्रकाश संश्लेषण क्रिया होत नाही. परिणामी अन्न साखळीत बाधा होऊन झाडांची पाने, फुले गळून पडतांनाच झाडे देखील वाळू लागली आहेत. कोळशाच्या धुळीमुळे वनसंपदा नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे धूळ प्रदूषणापासून वनसंपत्तीचं संरक्षण करण्याची गरज निर्माण झाली आहे.

वेकोलिच्या वणी क्षेत्रातील कोलगाव, मुंगोली, पैनगंगा या कोळसाखाणींतून दिवसरात्र कोळशाची वाहतूक सुरु असते. चारगाव चौकी-आबई ते शिंदोला, साखरा (को.) या मार्गावर ५ ते ६ किमी परिसर हा जंगल व्याप्त आहे. या जंगल भागात मोह, बेहळा, टेंभुर्णी, कडुलिंब, पळस, येरुणी, काटबोर आदी बहुवार्षिक झाडे असून ती कोळशाच्या धुळीमुळे नष्ट होण्याची भीती निर्माण झाली आहे. जैवविविधता साखळी नष्ट होऊन यावर उपजीविका करणाऱ्या वन्य प्राण्यांच्या आहाराचा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. हिरव्यागार पानांवर धुळीचे कण साचत असल्याने झाडाची पाने पूर्णतः काळवंडली आहे. वनातील प्राणी हाच धूळ मिश्रित चारा खात असल्याने त्यांचे आरोग्य व जीव धोक्यात येऊ लागला आहे. त्यामुळे वनसंपदा व त्यावर अवलंबून असलेल्या प्राणीमात्रांचं संरक्षण होणे नितांत गरजेचे आहे. वन विभागाने याकडे लक्ष न दिल्यास मौल्यवान वृक्ष नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. एखाद्या व्यक्तीने एखाद झाडं तोडलं तरी वन विभाग त्यावर कार्यवाही करते. मग धूळ प्रदूषणाने अख्खी वनसंपदाच नष्ट होण्याच्या मार्गावर आली असतांनाही वन विभाग गप्प का, हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे. तेंव्हा कोळसा धूळ प्रदूषणापासून वनसंपदेचं संरक्षण करण्याची मागणी माजी जी.प. सदस्य विजय पिदूरकर यांनी वणी वन उपविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. या संदर्भात ५ डिसेंबरला खांदला ग्रामपंचायतीचे सरपंच हेमंत गौरकार यांनी देखील वन विभागाला निवेदन दिले होते. 


No comments:

Powered by Blogger.