प्रशांत चंदनखेडे वणी
घराशेजारी राहणाऱ्या दोन कुटुंबांमध्ये शुल्लक कारणावरून सुरु असलेला वाद विकोपाला गेला. वादाचे पर्यवसान मारहाणीत होऊन एका कुटुंबातील सदस्यांनी दुसऱ्या कुटुंबातील सदस्यांवर लोखंडी रॉड व फावड्याने हल्ला चढवून जखमी केल्याची घटना ९ डिसेंबरला सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास घडली. याबाबत पोलिस स्टेशनला देण्यात आलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.
मुकुटबन पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या अडेगाव ता. झरी येथे परिवारासह राहत असलेल्या रामदास नत्थू पाचभाई यांच्या घराशेजारी सुधाकर पुंडलिक पेटकर यांचं कुटुंबं वास्तव्यास आहे. दोनही कुटुंबांमध्ये घराच्या गल्लीतील जागेवरून वाद सुरु आहे. रामदास पाचभाई यांची गल्लीत जागा नसल्याचे सुधाकर पेटकर यांचे म्हणणे आहे. त्यामुळे ते त्यांना गल्लीत जाणे येणे करण्यास मज्जाव करीत होते. मात्र रामदास पाचभाई यांना घराच्या भिंतीची छपाई करायची असल्याने त्यांनी सुधाकर पेटकर यांना गल्ली मोकळी करून देण्यास सांगितले. परंतु सुधाकर पेटकर यांनी रामदास पाचभाई यांना गल्लीत त्यांची जागा नसल्याचे सांगून भिंतीची छपाई करू देण्यास नकार दिला. तेंव्हा रामदास पेटकर यांनी तुमच्या घरावरील टिन तुमच्या हद्दीत सरकवून घ्या असे म्हणताच सुधाकर पेटकर यांनी रामदास पाचभाई यांच्याशी वाद घातला. त्यानंतर या दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. यातच सुधाकर पेटकर, त्यांचा मुलगा गणेश पेटकर व जावई रमेश धुर्वे यांनी संगनमत करून रामदास पाचभाई यांच्यावर लोखंडी रॉड व फावड्याने हल्ला चढविला. शेजाऱ्यांनी वडिलांवर हल्ला चढविल्याचे पाहून नुकताच शेतातून आलेला त्यांचा मुलगा तुळशीराम पाचभाई याने मध्यस्थी करीत शेजाऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र काही एक ऐकण्याच्या मनस्थितीत नसलेल्या पेटकर पिता पुत्र व जावयाने लोखंडी रॉड व फावड्याने बापलेकांना जबर मारहाण केली. यात दोघेही बापलेक गंभीर जखमी झाले आहेत. रामदास पाचभाई यांच्या हाताला व डाव्या कानाच्या मागील बाजूला लोखंडी सळाख मारण्यात आली. तर तुळशीराम पाचभाई यांच्या दोनही पायावर व हातावर लोखंडी सलाखीने मारून जखमी करण्यात आले आहे. बापलेकांना मारहाण होत असल्याचे पाहून गावातील काही लोक धावून आले व त्यांनी मध्यस्थी केली.
याबाबत रामदास पाचभाई यांनी पोलिस सेटशनला दिलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी सुधाकर पुंडलिक पेटकर (५०), गणेश सुधाकर पेटकर (३०), रमेश धुर्वे (३५) यांच्यावर बीएनएसच्या कलम ११५ (२), ११८(१), ३(५), ३५१(२), ३५२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास मुकुटबन पोलिस करीत आहे.
No comments: