Latest News

Latest News
Loading...

लालपुलिया येथील दोन बिर्याणी सेंटवर पोलिसांची कार्यवाही, ३० ते ३५ किलो गोमांस केले जप्त

प्रशांत चंदनखेडे वणी 

वणी यवतमाळ मार्गावरील लालपुलिया येथील दोन बिर्याणी सेंटरवर कार्यवाही करून पोलिसांनी दोनही बिर्याणी सेंटर मधून जवळपास ३० ते ३५ किलो गोमांस जप्त केले आहे. ही कार्यवाही मंगळवार दि. १४ जानेवारीला दुपारच्या सुमारास करण्यात आली. या प्रकरणी दोन बिर्याणी विक्रेते व एका गोमांस विक्रेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून बिर्याणी सेंटर चालविणाऱ्या दोनही मालकांना ताब्यात घेण्यात आले आहे. जत्रा मैदान परिसरात गोवंशाचे शीर व मांस आढळल्याची घटना ताजी असतांनाच लालपुलिया परिसरातील बिर्याणी सेंटरवर मोठ्या प्रमाणात गोमांस आढळून आल्याने हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. पोलिस स्टेशन येथे मोठ्या संख्येने जमलेल्या कार्यकर्त्यांनी आरोपींवर कठोर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.   

चिखलगाव हद्दीत येणाऱ्या लालपुलिया येथे आफताब व केजीएन हे दोन बिर्याणी सेंटर प्रचलित आहेत. अनेक वर्षांपासून या परिसरात हे बिर्याणी सेंटर सुरु आहेत. बिर्याणीसाठी प्रसिद्ध असलेल्या या दोन्ही बिर्याणी सेंटरवर बिर्याणी खाणाऱ्या ग्राहकांची तुफान गर्दी असते. मात्र या दोन्ही बिर्याणी सेंटरवर मंगळवारी दुपारी हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी धाबा बोलला. या दोन्ही बिर्याणी सेंटरवर गोमांस बिर्याणी व शिजविलेले गोमांस विक्री होत असल्याच्या माहिती वरून कार्यकर्त्यांनी या दोन्ही बिर्याणी सेंटरची झडती घेतली असता तेथे मोठ्या प्रमाणात गोमांस आढळून आले. त्यानंतर कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले. त्यांनी लगेच पोलिसांना तेथे बोलावून दोन्ही बिर्याणी सेंटरमध्ये साठवून ठेवलेले गोमांस पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले. पोलिसांनी या दोन्ही बिर्याणी सेंटर मधील मांस जप्त करून त्याचे नमुने तपासणी करीता पाठविले आहे. बिर्याणी सेंटरवर शिजविलेले गोमांस विक्री करणाऱ्या आफताब व केजीएन या दोन्ही बिर्याणी सेंटर मालकांवर कठोर कार्यवाही करण्याची मागणी करतांनाच कार्यकर्त्यांनी तशी तक्रारही पोलिस स्टेशनला नोंदविली आहे. 

सकल हिंदू समाज संघटनेच्या कार्यकर्त्यांनी नोंदविलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी आफताब बिर्याणी सेंटरचे मालक सैय्यद इमरान सय्यद इस्माईल (42) रा. एकता नगर व त्यांना गोमांस विक्री करणाऱ्या पाशा कुरेशी रा. मोमिणपुरा यांच्यावर गुन्हा दाखल केला असून यापैकी सैय्यद इमरान सय्यद इस्माईल याला ताब्यात घेतले आहे. त्याचप्रमाणे  केजीएन बिर्याणी सेंटरचे मालक आयफाज खान इब्राहिम खान (41) रा. चिखलगाव यांनाही ताब्यात घेण्यात आले असून त्यांनीही पाशा कुरेशी यांच्या कडूनच मांस खरेदी केल्याची पोलिसांना कबुली दिली आहे. गोमांस प्रकरणाशी संबंधित तीनही आरोपींवर पोलिसांनी महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहे. 


No comments:

Powered by Blogger.