Latest News

Latest News
Loading...

एलसीबी पथकाची मोठी कार्यवाही, दोन ट्रकांमधून होणारी गोवंश जनावरांची तस्करी रोखली, १२१ गोवंश जनावरांना दिले जीवनदान

प्रशांत चंदनखेडे वणी 

दोन ट्रकांमधून गोवंश जनावरांची होणारी तस्करी यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखा पथकाने रोखली. कत्तली करिता नेणाऱ्या गोवंश जनावरांना पथकाने जीवनदान दिले. गोवंश जनावरांची अवैध वाहतूक करणारे दोन ट्रक एलसीबी पथकाने ताब्यात घेतले आहे. ही धडक कार्यवाही ६ जानेवारीला पहाटे ५ वाजताच्या सुमारास करण्यात आली. या कारवाईत पथकाने १२१ गोवंश जनावरे व दोन ट्रक असा एकूण ८७ लाख २१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच तीन आरोपींना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

एलसीबी पथक पांढरकवडा हद्दीत गुन्हेगारांचा शोध घेत असतांना त्यांना नागपूर-पांढरकवडा-हैद्राबाद मार्गे गोवंश जनावरांची वाहतूक होणार असल्याची विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली. या माहिती वरून एलसीबी पथकाने नागपूर हैद्राबाद महामार्गावरील केळापूर टोल प्लाझा जवळ सापळा रचला. या मार्गाने जाणाऱ्या संशयित वाहनांची तपासणी करीत असतांनाच पहाटे ५ वाजताच्या सुमारास गोवंश जनावरांची अवैध वाहतूक करणारे दोन ट्रक पथकाच्या हाती लागले. या दोन्ही ट्रकांची तपासणी केली असता या ट्रकांमध्ये निर्दयीपणे कोंबून असलेली गोवंश जनावरे आढळून आली. लगतच्या राज्यात कत्तली करीता ही गोवंश जनावरे ट्रकांमध्ये भरून नेली जात असल्याचे एलसीबी पथकाच्या चौकशीत पुढे आले. एलसीबी पथकाचं खबरी नेटवर्क अत्यंत स्ट्रॉंग असल्याने व त्यांचा माहिती मिळविण्याचा ओघ मोठा असल्याने त्यांनी अनेक गंभीर गुन्ह्यांचा छडा लावतानाच बिळात दडून बसलेल्या गुन्हेगारांच्याही मुसक्या आवळल्या आहेत. आपल्या माहिती कौशल्याच्या जोरावर त्यांनी मोठ्या प्रमाणात होणाऱ्या या  गोवंश जनावरांच्या तस्करीचा पर्दाफाश केला आहे. 

दोन मोठ्या ट्रकांमधून होणारी गोवंश जनावरांची तस्करी एलसीबी पथकाने उधळून लावली असून कत्तलीकरिता नेणाऱ्या तब्बल १२१ गोवंश जनावरांना जीवनदान दिले आहे. तसेच गोवंश जनावरांना कत्तलखान्यात घेऊन जाणाऱ्या मोहंमद हातम अब्दुल नवी (४९) रा. मूर्तिजापूर जि. अकोला, मोसिन अली सय्यद मोबीन (४५) रा. रेत ता. आकोट जि. अकोला, इरशाद उल्लाखा किस्मत उल्ला खॉ (३२) रा. पठाणपुरा मूर्तिजापूर ता. मूर्तिजापूर जि. अकोला या तीन आरोपींना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. गोवंश तस्करांच्या तावडीतून १२१ जनावरांची सुटका करतांनाच एलसीबी पथकाने दोन ट्रकांसह (CG 24 S 7667, MH 26 BN 1137) जवळपास ८७ लाख २१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

ही कार्यवाही जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता, पांढरकवडा एसडीपीओ रामेश्वर वैंजणे यांच्या मार्गदर्शनात पो.नि. सतिश चवरे, सपोनि अजयकुमार वाढवे, पोहवा उल्हास कुरकुटे, सुनील खंडागळे, सुधिर पांडे, पो.ना. सुधिर पिदूरकर, निलेश निमकर, पोकॉ रजनीकांत मडावी, पो.ना. सतिश फुके व एलसीबी पथकाने केली.  

No comments:

Powered by Blogger.