तालुक्यात रेती तस्करीला उधाण, अधिकारी व कर्मचारी तस्करांच्या दिमतीला आणि म्हणूनच बळ मिळतं तस्करांच्या हिंमतीला
प्रशांत चंदनखेडे वणी
वणी तालुका हा रेती तस्करीचा हॉसस्पॉट बनला आहे. रेतीची तस्करी करून तस्कर तर गब्बर बनलेच आहेत. पण त्यांची पाठराखण करणारे अधिकारी व कर्मचारीही मालामाल झाले आहेत. खनिज तस्कर व अवैध व्यावसायिकांसाठी काळ्या पैशाचा स्रोत असलेला हा तालुका अधिकारी वर्गालाही आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणारा ठरला आहे. झटपट श्रीमंत होणाऱ्यांसाठी वणी तालुक्यात अनेक अवैध धंद्यांचे मार्ग उपलबध आहेत. येथे अधिकारीही सहज दावणीला बांधता येतात, पैशाने सर्वांचीच तोंडं बंद करता येतात, ही या तालुक्याची ओळख बनली आहे. येथे अधिकारी बदलून येतात आणि प्रचंड कमाई करून जातात. कारण खनिज तस्कर व त्यांच्या पाठिराख्यांविरुद्ध कार्यवाहीची जोखीम पत्करण्याऎवजी ते हितसंबंध जोपासण्यावर भर देतात. त्यामुळे काळ्या पैशात त्यांचाही मोठा वाटा असतो. कार्यवाही करणारेच वाटेकरी झाल्याने तालुक्यात खनिज तस्करांना रान मोकळे झाले आहे.
तालुक्यात वाळू माफियाराज आल्याचं दिसत आहे. रेती घाटांवरून सर्रास रेतीची तस्करी सुरु आहे. रेतीची अवैध वाहतूक करणारे हायवा ट्रक शहरात राजरोसपणे रेती खाली करतांना दिसतात. रेती घाटांवरून चोरून आणलेली रेती बिनधास्त काळ्या बाजारात विकली जात आहे. पण ही रेती तस्करी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या डोळ्यांनी मात्र दिसत नाही. कारण त्यांनी डोळ्यावर महागडे काळे चष्मे लावून घेतले आहेत. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांची रेती तस्करांशी मिलीभगत तर नाही ना, ही चर्चा आता शहरात रंगू लागली आहे. एका वृत्तपत्राने तर चक्क एक पोलिस शिपाईच रेती तस्करीत उतरला असल्याचे वृत्त प्रकाशित करून खळबळ उडवून दिली आहे. या पोलिस शिपायाचे स्वतःचे दोन ट्रक असून तो स्वतः वाळू माफियांच्या पंगतीत बसला असल्याचे वृत्त प्रकाशित झाल्याने शहरात चांगलीच चर्चा रंगली आहे. पोलिस शिपाईच तस्करांचा साथीदार झाल्याने "अब डर काहेका" या चर्चेने शहरात रान उठवले आहे. पोलिस शिपाई रेती तस्कर बनल्याचे वृत्त प्रकाशित झाल्याने पोलिसांची प्रतिमा डागाळली आहे.
तालुक्यातील रेती घाटांवर तस्करांनी अक्षरशः कब्जा केल्याचे दिसून येत आहे. रेती घाटांवर वाळू माफियांचा दरारा दिसून येतो. रेती घाटांकडे कुणी फिरकले तरी तस्कर त्याची चौकशी करतात. रेती घाटांकडे ते कुणालाही फिरकू देत नाही. संबंधित अधिकारी व कर्मचारी तर त्यांनी दावणीला बांधले आहेत. त्यामुळे रेती घाटांकडे जाणाऱ्या रस्त्यांवर त्यांचा पाहारा दिसून येतो. रात्री रेती घाटांवरून मोठ्या प्रमाणात वाळूची चोरी केली जाते. नदी पात्रातून बेसुमार रेतीचा उपसा करून हायवा ट्रकांनी रेती ब्लॅक मार्केटमध्ये विकली जाते. रात्री रेती घाटांवरून रेती भरलेले हायवा ट्रक निघत असतांना महसूल विभाग मात्र त्यांच्यावर कार्यवाही करण्यास धजावत नाही. शहरातील मुख्य चौकात व प्रमुख रस्त्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. तेंव्हा रोजच्यारोज सीसीटीव्ही फुटेज तपासले तरी रेती चोरी करणारे ट्रक सापडतील. पण अधिकारी वर्ग आपल्या हितसंबंधात कमालीचा प्रामाणिकपणा जपताना दिसतात. त्यामुळे रेती तस्करांचं चांगलंच फावत आहे. घरकुल धारक व सर्वसामान्यांना रेती मिळत नसल्याने त्यांचे घराचे स्वप्न भंगले आहे. तर काळ्या बाजारात सहज रेती उपलब्ध होत आहे. अनेक दिवसांपासून रेती तस्करी सुरु असल्याची ओरड होत असतांनाही रेती तस्करी रोखण्याकरिता महसूल विभागाकडून कुठलेही ठोस पाऊल उचलण्यात आल्याचे दिसत नाही. त्यामुळे तस्करांना रान मोकळं झाल्याचे दिसून येत आहे.
आता तर पोलिस शिपाईच रेती तस्करीत उतरला असल्याचे वृत्त एका वृत्तपत्राने प्रकाशित केले आहे. त्यामुळे शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे. पोलिस शिपाईच रेती तस्करीत गुंतल्याचे वृत्त झळकल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दुसऱ्याच्या नावावर ट्रक घेऊन हा पोलिस शिपाई रेती तस्करीच्या काळ्या धंद्यात उतरल्याचे प्रकाशित वृत्तात म्हटले आहे. रेतीची काळ्या बाजारात विक्री केल्यानंतर मिळणारा काळा पैसा शहरालगत असलेल्या एका गावातील व्यक्तीकडे जमा होतो, आणि नंतर तो पैसा पोलिस शिपायाकडे वळता होतो. पोलिस कर्मचारीच काळ्या धंद्यात उतरू लागल्याने कार्यवाहीची अपेक्षा तरी कुणाकडून करावी, हा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. अवैध व्यावसायिकांशी पोलिसांचे संबंध व दोस्ताना वाढल्याने ते प्रचंड निर्ढावले आहेत. आणि त्यामुळेच गुन्हेगारी प्रवृत्ती वाढू लागली आहे. वणी हा शांतताप्रिय तालुका आहे. त्यामुळे शांतता टिकवून ठेवणे ही प्रशासन व पोलिसांची जबाबदारी आहे. पण रेती तस्करी व अवैध धंद्यांना पाठबळ आणि हितसंबंध जोपासून ते आपल्या कर्तव्याला बगल देतांना दिसत आहेत.
Comments
Post a Comment