डीपी रोडवर होऊ लागले पक्के अतिक्रमण, नगर पालिकेचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष
प्रशांत चंदनखेडे वणी
वणी नगर पालिकेचा अजब कारभार पाहायला मिळत आहे. नगर पालिकेच्या उलट कारभारामुळे वेळ व पैसा व्यर्थ खर्च होत असल्याचे चित्र आता नेहमीचेच झाले आहे. रस्त्यालगत व शासकीय जमिनीवर अतिक्रमण होत असतांना नगर पालिका त्याकडे दुर्लक्ष करते, व नंतर लाखो रुपये खर्च करून अतिक्रमण हटाव मोहीम राबविते. आधी अतिक्रमण होऊ द्यायचं आणि नंतर हटाव मोहीम राबवून पाठ थोपटून घ्यायची, हा नगर पालिका प्रशासनाचा नेहमीचाच फंडा झाला आहे. यापूर्वीही नगर पालिकेने अनेकदा अतिक्रमण हटाव मोहीम राबविली. पोलिस बंदोबस्तात मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविली. परंतु काही दिवसांतच अतिक्रमण जैसे थे झाले आहे. त्यामुळे "आम्ही मारल्यासारखे करतो, तुम्ही रडल्यासारखे करा" हे धोरण नगर पालिकेने अवलंबले असल्याचे पाहायला मिळत आहे.
नांदेपेरा रोडवरील अतिक्रमण हटवितांना दुजाभाव करण्यात आल्याच्या अनेक तक्रारी झाल्या. मात्र नगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभाग मूग गिळून चूप बसला. या मार्गावरील काँक्रीट नालीने नागमोडी वळण घेतले. कारण येथे सोइ नुसार काम करण्यात आले. मुख्य रस्त्यांवर पक्के बांधकाम केले जाते.आणि नंतर रस्त्याचे बांधकाम करतांना मात्र धनदांडग्यांना सूट दिली जाते. हा प्रकार आता शहरात नेहमीचाच झाला आहे. गौरकार कॉलनी (रेल्वे स्टेशन) परिसरातील डीपी रोडवरही आता पक्के अतिक्रमण करणे सुरु झाले आहे. परंतु नगर पालिका प्रशासनाला याबाबत वारंवार माहिती देऊनही न.प. प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतांना दिसत आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून खुला असलेला डीपी रोड आता अतिक्रमणाच्या विळख्यात अडकायला सुरवात झाली आहे. डीपी रोडवर ठिकठिकाणी पक्के बांधकाम करण्यात येत असल्याने येथील रहिवाशांमध्ये डीपी रोडबाबत आता संभ्रम निर्माण झाला आहे.
वणी वरोरा मुख्य मार्गापासून (कॉटन मार्केट जवळ) तर नांदेपेरा रोड व चिखलगाव पर्यंत १०० फुटांचा डीपी रोड रेल्वे स्टेशन जवळून जाणार असल्याचे अनेक दिवसांपासून सांगण्यात येत आहे. माजी आमदार व नगर पालिकेनेही तसा दुजोरा दिला होता. अनेक वर्षांपासून रेल्वे स्टेशन हद्दीलगत अंदाजे १०० फूट खुली जागा सुटलेली आहे. येथून १०० फुटांचा डीपी रोड बनणार असल्याचे अनेक दिवसांपासून ऐकायला मिळत आहे. आता तर वणी वरोरा मार्गावरील उडाणपूलापासून डीपी रोडच्या बांधकामालाही सुरुवात होणार असल्याच्या चर्चा ऐकायला मिळत होत्या. एवढेच नाही तर डीपी रोड बनणार असल्याने गौरकार कॉलनी (रेल्वे स्टेशन) येथे पक्का सिमेंट रस्ता व भूमिगत नालीचे देखील बांधकाम करण्यात आले नाही. गौरकार कॉलनी हा एकमेव भाग असेल जेथे भूमिगत नाली बांधण्यात आली नाही. काही दिवसांपूर्वी येथे पाणी पुरवठ्याची नवीन पाईप लाईन टाकण्यात आली. त्यावेळीही येथून डीपी रोड बनणार असल्याचे सांगण्यात आले होते.
मात्र डीपी रोडवरील खुल्या जागेवर आता ठिकठिकाणी अतिक्रमण करणे सुरु झाले आहे. डीपी रोडवर पक्के बांधकाम केले जात असल्याने हा खरंच डीपी रोड आहे किंवा नाही हा संभ्रम येथील रहिवाशांमध्ये निर्माण झाला आहे. अगदीच रेल्वेच्या भिंती पर्यंत पक्के बांधकाम करून एका व्यावसायिकाने डीपी रोडलाच आव्हान दिले आहे. डीपी रोड असलेल्या जागेवर तो आपला मालकीहक्क सांगत असल्याने डीपी रोडबाबत येथील रहिवाशांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. तसेच एका व्यक्तीने या डीपी रोडवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केल्याचेही पाहायला मिळत आहे. या रोडवर मोठा जनावरांचा गोठाच बांधण्यात आला आहे. नगर पालिका प्रशासनाला याबाबत वारंवार माहिती देऊनही नगर पालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे एकाचे पाहून दुसराही डीपी रोडवर बांधकाम करण्याच्या तयारीत लागला आहे. डीपी रोडवरील खुल्या जागेवर ठिकठिकाणी अतिक्रमण धारकांनी कब्जा केल्याने येथील रहिवाशीही आता आपापल्या घरासमोरील जागेवर बांधकाम करण्याच्या तयारीला लागले आहेत. डीपी रोड असलेल्या खुल्या जागेवर पूर्णपणे अतिक्रमण झाल्यानंतरच नगर पालिका प्रशासन अतिक्रमण हटाव मोहीम राबवून लाखोंचा खर्च करेल. नंतर पोलिसांचा बंदोबस्त घेतला जाईल आणि पैसा व वेळ व्यर्थ खर्च केला जाईल. परंतु वेळेपूर्वी कुठलेही ठोस पाऊल उचलण्याची तसदी मात्र नगर पालिका घ्यायला तयार नाही. तेंव्हा डीपी रोड अतिक्रमणाच्या विळख्यात अडकण्यापूर्वीच योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी होऊ लागली.
Comments
Post a Comment