प्रशांत चंदनखेडे वणी
तालुक्यातील ग्रामीण जनता वाघाचे दर्शन होत असल्याने प्रचंड दहशतीत आली आहे. गाव शिवारालगत असलेल्या झुडपी जंगलात वाघाचा वावर असल्याचे दिसून येत आहे. गावकऱ्यांना वाघाचे दर्शन होऊ लागल्याने त्यांच्यात कमालीची धास्ती निर्माण झाली आहे. शेतकरी व शेत मजुरांचे शेतात जाणे कठीण झाले आहे. शेतात कामे करणारे शेतकरी व शेत मजूर भीतीच्या सावटात वावरतांना दिसत आहे. तेंव्हा मानवी जीवाला धोका उद्भवण्यापूर्वी या वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामपंचायत सरपंचांनी वणी वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
वणी तालुक्यातील येनक, टाकडी, चिखली, चनाखा या गावातील नागरिकांना एक ते दोन महिन्यांपासून सातत्याने वाघाचे दर्शन होत आहे. या गावालगत असलेल्या झुडपी जंगलात वाघाचा वावर असल्याने नागरिक दहशतीत आले आहेत. वाघाच्या दहशतीमुळे शेतकरी व शेतमजुरांचे शेतात जाणे कठीण झाले आहे. वाघाचे दर्शन होत असल्याने शेतमजूर शेतात जायला तयार नसल्याने शेतातील कामे खोळंबली आहेत. शेमजुरांअभावी शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. वाघाने येनक व परमडोह शेत शिवारात पाळीव जनावरांवर हल्ला करून त्यांना ठार केल्याची घटना काही दिवसांपूर्वी समोर आली होती. अजूनही येथील नागरिकांना वाघाचे दर्शन होत असल्याने धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मानवी जीवाला धोका उद्भवण्यापूर्वी या वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामपंचायत सरपंचांनी वणी वन विभागाला दिलेल्या निवेदनातून केली आहे. निवेदन देतांना सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष प्रविण झाडे, उपाध्यक्ष नागेश धनकसार, येनक ग्रामपंचायतीच्या सरपंच कल्पना टोंगे, सरपंच विद्या पेरकावार यांच्यासह ग्रामपंचायतीचे सरपंच उपस्थित होते.
No comments: