अखेर ठाणेदार अनिल बेहेरानी यांची तडकफडकी बदली, गोपाल उंबरकर असतील वणी पोलिस स्टेशनचे नवीन ठाणेदार

प्रशांत चंदनखेडे वणी 

वणी पोलिस स्टेशनचे ठाणेदार अनिल बेहेरानी यांची तडकाफडकी बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी गोपाल उंबरकर हे वणी पोलिस स्टेशनचे नविन ठाणेदार म्हणून नियुक्त होणार असल्याची माहिती मिळाली आहे. आधी पुसद ग्रामीणला असलेले गोपाल उंबरकर हे वणी पोलिस स्टेशनचा लवकरच पदभार सांभाळणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. वणी पोलिस स्टेशनमध्ये खांदेपालट होणार असल्याची चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरु होती. त्यातच ठाणेदार अनिल बेहेरानी यांची बदली झाल्याने या चर्चेला पूर्ण विराम मिळाला आहे. पोलिस अधिकाऱ्यांच्या जिल्हा बदली काळात अनिल बेहेरानी यांना वणी पोलिस स्टेशनमध्ये नियुक्ती मिळाली होती. मात्र दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच त्यांची उचलबांगडी करण्यात आली. ठाणेदार अनिल बेहेरानी यांच्या कार्यकाळात गुन्हेगारी प्रवृत्तीत झालेली वाढ व दीपक चौपाटी परिसरात शेकडो गोवंश जनावरांच्या झालेल्या हत्येचा ठपका ठेऊन त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आल्याची चर्चा रंगली आहे. शेकडो गोवंश जनावरांच्या हत्या प्रकरणी गोसेवा आयोग समिती नेमण्यात आली होती. गोवंश आयोग समितीने गोवंश हत्या प्रकरणात सादर केलेल्या चौकशी अहवालाच्या आधारावर ठाणेदार अनिल बेहेरानी यांची बदली करण्यात आल्याच्याही चर्चा ऐकायला मिळत आहे.

जिल्हा बदली काळात अनिल बेहेरानी यांना वणी पोलिस स्टेशनमध्ये नियुक्ती मिळाली. वणी पोलिस स्टेशनचा पदभार सांभाळल्यानंतर दोन वर्षांचाही कार्यकाळ पूर्ण झालेला नसतांना त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. त्यांच्या कार्यकाळात गुन्हेगारी कारवाया प्रचंड वाढल्या होत्या. गुन्हेगारी प्रवृत्तीतही प्रचंड वाढ झाली होती. अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढले होते. यातच भर म्हणजे गोवंश जनावरांची मोठ्या प्रमाणात कत्तल झाली. गोवंश जनावरांचे दोन शीर आढळून आल्यानंतर गोवंश जनावरांचा कत्तलखाना सुरु असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर गोसेवा आयोग समिती नेमण्यात आली. गोसेवा आयोग समितीने परिस्थितीजन्य पुरावे गोळा करून काही अधिकाऱ्यांवर कार्यवाहीत कसूर केल्याचा ठपका ठेवला होता. गोसेवा समितीने चौकशी अहवाल सादर केल्यानंतर ठाणेदारांच्या बदलीच्या चर्चेचे वारे वाहू लागले. अशातच ठाणेदार अनिल बेहेरानी यांची तडकाफडकी बदली करण्यात आल्याने या चर्चेला आता पूर्ण विराम मिळाला आहे. त्याचबरोबर पोलिसांचे रेती तस्करी केनेक्शनही चांगलेच चर्चेत आले. पोलिसच रेती तस्करीत गुंतल्याचे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर ठाणेदारांच्या अडचणीत आणखीच भर पडली. त्यातल्यात्यात वणी पोलिस स्टेशन मधील एक पोलिस कर्मचारी वर्दीतच दारूच्या नशेत तर्रर्र झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाला. त्यामुळे ठाणेदार अनिल बेहेरानी यांची गुन्हेगारीवर व कर्मचाऱ्यांवर वचक राहिली नसल्याचा ठपका ठेऊन त्यांची उचलबांगडी करण्यात आल्याच्या चर्चा ऐकायला मिळत आहे. वणी पोलिस स्टेशनचे नवीन ठाणेदार म्हणून गोपाल उंबरकर हे लवकर पदभार सांभाळणार आहेत. त्यांच्यापुढेही गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्याचे मोठे आव्हान उभे राहणार आहे.  

रवि बेलुरकर यांचा अल्टिमेटम आणि ठाणेदारांची बदली 

श्रीराम नवमी उत्सव समितीचे रवि बेलुरकर यांनी अवैध धंद्यांविरुद्ध आंदोलन उभारले होते. त्यांनी शहरातील अवैध धंदे बंद करण्यासंदर्भात सतत निवेदने देऊन पोलिस स्टेशन समोर ठिय्या आंदोलनही केले. गोवंश कत्तली संदर्भातही त्यांनी पोलिस प्रशासनावर ताशेरे ओढले होते. पोलिस प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे शहरात अवैध धंदे व गुन्हेगारी प्रवृत्ती वाढल्याचा आरोप करीत त्यांनी ठाणेदारांच्या बदलीची जोरदार मागणी लावून धरली होती. १७ जानेवारीला त्यांनी एसपी, डीएसपी व गृहमंत्रालयाला निवेदन पाठवून ठाणेदारांच्या बदलीची मागणी केली होती. १५ दिवसांत ठाणेदार अनिल बेहेरानी यांची बदली करण्यात न आल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी निवेदनातून दिला होता. मात्र १३ दिवसांतच ठाणेदार अनिल बेहेरेनी यांची बदली करण्यात आल्याने रवि बेलुरकर यांच्या मागणीला यश आल्याचे दिसत आहे.

Comments

Popular posts from this blog

(Breaking News) वणी वरोरा महामार्गावर भीषण अपघात, दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

नंदीग्राम एक्सप्रेसने कटून तरुणीचा मृत्यू, तरुणीने आत्महत्या केल्याचा संशय

वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि झाला अपघात, एक महिला ठार तर आठ जण जखमी