प्रशांत चंदनखेडे वणी
तालुक्यातील मोहर्ली ग्रामपंचायत कार्यालयात कर्तव्यावर असलेल्या ग्रामसेवकाला जातीवाचक शिवीगाळ करून बघून घेण्याची धमकी देणाऱ्या ग्रामपंचायत सदस्यावर वणी पोलिस ठाण्यात ऍट्रॉसिटी व विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कवडू देवाजी वडस्कर वय अंदाजे ४० वर्षे रा. मोहर्ली असे या गुन्हा दाखल झालेल्या ग्रामपंचायत सदस्याचे नाव आहे.
तालुक्यातील नांदेपेरा येथे वास्तव्यास असलेले संदिप तातोबा शेंडे (४१) हे वणी पंचायत समिती अंतर्गत ग्रामसेवक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याकडे मोहर्ली व रांगणा या दोन ग्रामपंचायतीचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. ७ जानेवारीला ते मोहर्ली ग्रामपंचायत कार्यालय येथे कर्तव्यरत असतांना ग्रा.प. सदस्य कवडू वडस्कर हे दुपारी १ वाजताच्या सुमारास ग्रामपंचायत कार्यालयात आले. आणि ग्रामसेवकाच्या बाजूला खुर्चीवर येऊन बसले. त्यावेळी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच दीपमाला वडस्कर, पाणी पुरवठा कर्मचारी निखिल झाडे, योजनादूत निखिल कोल्हे व अन्य दोन जण हजर होते. ग्रा.प. सदस्य कवडू वडस्कर याने वीज बिल कुणाच्या सांगण्यावरून भरण्यासाठी दिले, यावरून वाद उपस्थित केला. तेंव्हा ग्रामसेवक संदिप शेंडे यांनी सरपंचांच्या सांगण्यावरून वीज बिल भरण्यासाठी चेक दिल्याचे त्याला सांगितले. त्यावरून त्याने ग्रामपंचायतीचे काम माझ्याकडे दे, असे म्हणत वाद घातला. मात्र संदीप शेंडे यांनी ग्रामपंचायत सदस्याला काम देता येत नाही असे म्हणताच त्याने जातीवाचक शिवीगाळ करीत भर कार्यालयात ग्रामसचिवाचा अपमान केला. कवडू वडस्कर याची गावात दादागिरी असल्याने कार्यालयात उपस्थित असलेले कुणी काहीही बोलले नाही. त्यानंतर कवडू वडस्कर याने नियमबाह्य पद्धतीने जबरदस्ती कपाटात ठेऊन असलेले ग्रामपंचातीचे मासिक प्रोसेडिंग बुक नेले. तसेच ग्रामसेवकाला तुला बघून घेईल, तुला बरबाद केल्याशिवाय राहणार नाही, अशी धमकी दिली.
ग्रा.प. सदस्य कवडू वडस्कर याने कर्तव्यावर असलेल्या ग्रामपंचायत अधिकाऱ्याला अर्वाच्च शब्दांत धमकी व जातीवाचक शिवीगाळ केल्याने अपमानित झालेले संदीप शेंडे हे लगेच वणीला आले. त्यांनी ग्रामसेवक संघटना व गटविकास अधिकारी यांच्याशी चर्चा केल्यानंतर ९ जानेवारीला पोलिस स्टेशनला येऊन तक्रार नोंदविली. ग्रामसेवक संदीप शेंडे यांच्या तक्रारी वरून पोलिसांनी आरोपी ग्रा.प. सदस्य कवडू वडस्कर याच्यावर बीएनएसच्या कलम २२१, ३५१(२), ३५२ व अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यानुसार (ऍट्रॉसिटी) गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास एसडीपीओ गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनात एसडीपीओ कार्यालय पोलिस करीत आहे.
No comments: